तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी मंदे, नायब तहसीलदार राऊत, अव्वल कारकून हंगे यांच्यावर कारवाई होणार?
आ.संदीप क्षीरसागर अधिवेशनात आक्रमक
लवकरात लवकर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड जिल्हा पुरवठा विभागातून 5498 शीधापत्रिका गायब झालेल्या असून आतापर्यंत येथील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्यामुळे हे प्रकरण दाबलं की काय अशी शंका होती परंतु आता या प्रकरणामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनीच हात घातल्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. आज अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी गायब शिधापत्रिकाचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे प्रकरण अधिवेशनात गाजले. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येईल असे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
गोरगरीबांना अन्न मिळावे यासाठी राज्य शासन व केंद्र शासन मोठ्या प्रमाणात पुरवठा विभागामार्फत जो धान्य पुरवठा होतो त्यावर मोठा निधी खर्च होतो. परंतु येथील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गरजूपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्हा पुरवठा विभागाकडून 5498 शिधापत्रिका गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यापूर्वी बीड मतदारसंघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणाची तक्रार औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडेही केली होती. परंतु अजूनसुद्धा या प्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी हा प्रश्न आज हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. यावेळी त्यांनी या प्रकरणातील दोषींवर लवकरत लवकर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अधिवेशनात गाजल्यामुळे लवकरच यातील दोषींवर लवकरच कारवाई होणार.