हिंगोली (प्रतिनिधी) सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा पडत आहे. गोर गरीबांच्या हिताची कामे केली जात नाहीत. त्याचबरोबर सामान्य जनतेची प्रशासन पिळवणूक करते. शासन देखील बघ्याची भूमिका घेऊन सामान्य जनतेच्या हिताची कामे कठोर पावले उचलून करत नाही. यातून सरकारी तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा पडत आहे. हे रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जन आंदोलनात सहभागी व्हावे. चांगली पिढी निर्माण करून आपण या दरोड्या वर मात करू शकतो, असे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त तथा हिंगोली जिल्हा निरीक्षक अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
जन आंदोलनाच्या पुनर्रचनेसाठी अण्णा हजारे यांनी अँड. देशमुख यांना हिंगोली जिल्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर धायगुडे हे होते.
या वेळी बोलताना अँड. देशमुख पुढे म्हणाले की, समाजाची पिळवणूक होत असताना कार्यकर्त्यांनी बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी आणि सर्वांनीच कायम समाज व्यवस्थेत सहभाग वाढवायला हवा. समाजाचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे कार्यकर्त्यांचे काम आहे.
जन आंदोलनाच्या पुनर्रचनेनंतर कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या तर प्रश्न सोडवणे त्यांना कठीण जात नाही. निरपेक्ष आणि निस्वार्थी भावनेतून विधायक कार्यासाठी झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता संघटित होऊन जन आंदोलन वाढवायला हवे, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये संघटना वाढीसाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगत हिंगोली जिल्हा संघटक ज्ञानेश्वर धायगुडे यांनी आगामी काळात तालुका निहाय जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून नवे कार्यकर्ते देखील जोडणार असल्याचे सांगितले.
पुनर्रचना बैठकीचे कामकाज संपल्यानंतर अँड. देशमुख यांनी छोटेखानी प्रशिक्षण शिबीर घेऊन कार्यकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, संघटना वाढीसाठी प्रयत्न कसे व्हायला हवेत, त्याचबरोबर लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी सातत्याने कार्यरत कसे रहावे, अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना पुढील काळात आणखी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस दगडू गलांडे, सय्यद मीर, डॉ. अमोल अवचार, विश्वनाथ टोपरे, कल्याण पोले, ईश्वर काकडे, संदीप देशमुख, रामकृष्ण जैस्वाल, प्रभाकर खोंडे यांच्यासह अन्य हजर होते.