बंद कारखाने चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेणार
माजलगाव : प्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्व बंद कारखाने जर सुरू झाले तर अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार नाही. मराठवाड्याव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्यामुळे काही ऊस मराठवाड्याच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील कारखानदारांनी जाणीवपूर्वक बाऊ करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती घालू नये, शेतकऱ्यांनी “एकरकमी एफआरपी” मागू नये म्हणूनच साखर कारखानदार भीती घालत आहेत परंतु “एकरकमी एफआरपी” घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तसेच मराठवाड्यातले बंद कारखाने चालू करण्या बाबत शासन उदासीन आहे या बाबत देखील लक्ष वेधून साखर आयुक्तांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य मा. खा. राजू शेट्टी यांनी माजलगाव येथे केले. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,तालुकाध्यक्ष अमित नाटकर उपस्थित होते.
येथील रयत अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीला सदिच्छा भेटीसाठी आले असता राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,बीड जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली नाही तर वेळप्रसंगी साखर कारखान्यांना जाणारा ऊस रोखण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बंद कारखाने चालू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन आम्ही ते चालू केले परंतु दुर्दैव असे आहे की मराठवाड्यातील बंद कारखाने चालू करण्यासाठी सरकारही तितके प्रयत्न करीत नाही आणि ज्यांच्या ताब्यात हे कारखाने आहेत ते देखील प्रयत्न करीत नाहीत परंतु हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन हे कारखाने चालू केले पाहिजेत या बाबत साखर आयुक्त यांच्या सोबत बैठका झाल्या आहेत ज्यांच्या ताब्यात हे कारखाने आहेत त्यांना जर जमत नसेल तर हे कारखाने भाड्याने देण्या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे असेही ते म्हणाले.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराचा प्रश्न चिघळलेला आहे , एकरकमी एफआरपी देण्यासाठी 17 नोव्हेंबर पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी सुरू होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असलेले राजू शेट्टी हे माजलगाव येथे आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.