स्थलांतरीत ऊसतोड कामगारांना रेशन वरील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीचा लाभ द्यावा –पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड प्रतिनिधी : अन्न सुरक्षा कायदया अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री.भूजबळ यांनी जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आ.संदीप क्षीरसागर, आ.संजय दौंड, जिल्हा पुरवठा अधिकारी भारती साखरे, तहसिलदार श्री. खाडे, अमरसिंह पंडित, सुभाष राऊत, संबंधित विभागाचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री श्री.भूजबळ यांनी जिल्हयातील व शहरातील शिवभोजन थाळी चालकांच्या अडचणी व शिवभोजन थाळी पूरवठयाविषयी माहिती घेवून शिवभोजन थाळी चालकांच्या थकीत देयकांविषयी की तांत्रिक समस्यांचे तातडीने सोडवणूक केली जावी यामुळे सदर थकीत देयके वेळेत अदा करणे शक्य होईल आणि जनसामांन्यांना शिवभोजन थाळीचा लाभ विनाअडथळा मिळेल असे मंत्री श्री.भूजबळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीतून गरजू वंचित लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचावे यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांला हक्काचे रेशनवरील अन्नधान्य मिळालेच पाहिजे. बायोमॅट्रीक मधील तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांला रेशनच्या लाभापासून वंचित ठेवू नका. अन्न सुरक्षा कायदया अंतर्गत शहरी भागातील 59 हजार रू. व ग्रामीण भागातील 44 हजार रू. उत्पन्न असलेल्या प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच त्या लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे.असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री श्री.भूजबळ यांनी दिले.
*स्थलांतरीत ऊसतोड कामगारांना संबंधित साखर कारखान्यांवर रेशन वरील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीचा लाभ द्यावा–पालकमंत्री धनंजय मुंडे यांची सूचना*
बीड जिल्हयातील स्थलांतरीत ऊसतोड कामगारांचे राज्यातील इतर साखर कारखान्यांवर स्थलांतर होत असल्याने त्यांना रेशनवरील अन्नधान्याच्या लाभापासून वंचित व्हावे लागते. त्यांना सदर लाभ हा स्थलांतरीत झालेल्या संबंधित साखर कारखान्यावर देता यावा यासाठी यादया बनवून कारखाना प्रशासनाकडे पाठवा.तसेच रेशनवरील अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहचावे,असे पालकमंत्री श्री.मुंडे म्हणाले.
तसेच या स्थलांतरीत ऊसतोड कामगारांसाठी शिवभोजन थाळीची सुविधा उपलब्ध करून दिली जावी,अशी सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी केली.
यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री श्री.भूजबळ यांनी बीड तालुक्यातील राशनच्या धान्यासंबंधी तक्रारींबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली पुन्हा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले. याप्रसंगी बीड तालूक्यातील पात्र लाभार्थ्यांना व गरजूंना लवकरात लवकर शिधापत्रिका उपलब्ध करून वाटप करा,अशा सूचना त्यांनी दिल्या.