बसस्थानक इमारत व अन्य सुविधांसाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या कामास होणार प्रत्यक्ष सुरुवात*
परळी (दि. ०९) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीच्या जनतेला निवडणुकीत दिलेल्या आणखी एका वचनाची पूर्तता केली असून, परळी शहरातील बसस्थानकाचा आता कायापालट होणार आहे. बसस्थानक इमारत बांधकाम, सांडपाण्याची व्यवस्था, पाणी पुरवठा, विद्युत काम, काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉकिंग आदी कामांसाठी एकूण ५ कोटी ३४ लाख १० हजार रुपयांच्या कामाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, येत्या काही दिवसातच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ नगरी परळी शहराच्या बसस्थानकाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मागील सत्ताधाऱ्यांनी बसस्थानकामध्ये जाऊन अनेकवेळा या कामाचे निवडणुकाभिमुख भूमिपूजन केले मात्र प्रत्यक्षात एकही रुपयाही निधी त्यांना या कामासाठी उपलब्ध करता आला नाही.
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत बसस्थानकाचा कायापालट करण्याचे अभिवचन परळीकरांना दिले होते. त्यानुसार ना. मुंडे यांनी परिवहन विभागाकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून परळी शहर बसस्थानाक इमारत नूतनीकरण व अन्य कामांसाठी हा निधी मंजूर करवून घेतला आहे.
परिवहन विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या अंदाजपत्रकानुसार बसस्थानक इमारतीचा तळमजला व पहिला मजला पुनर्बांधणी साठी २ कोटी ८९ लाख रुपये, सांडपाणी व्यवस्थापन व पाणीपुरवठ्यासाठी १४ लाख ४९ हजार रुपये, विद्युत कामासाठी २८ लाख ९८ हजार रुपये, काँक्रीटीकरण कामासाठी १ कोटी रुपये, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ८ लाख रुपये, लँडस्केपिंग साठी ४ लाख रुपये व अन्य असे एकूण ५ कोटी ३४ लाख रुपयांचे एकूण काम यांतर्गत पूर्ण करण्यात येईल.
येत्या काही दिवसातच या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार असून, जलदगतीने व अत्यंत दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना ना. मुंडे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.