बीड: मग्रारोहयो अंतर्गत बीड तालुक्यामध्ये सन २०२३-२४ मधील डिलीट झालेले वर्ककोड लाभार्थ्यांकडून पैसे घेवून, नियमबाह्यपणे पुन्हा सन २०२५-२६ मध्ये काढल्याप्रकरणी गटविकास अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. यानंतर दि.९ डिसेंबर रोजी वादग्रस्त गटविकास अधिकारी अशोक राठोड यांच्याकडील पदभार काढून त्याठिकाणी अनिरूध्द सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड पंचायत समिती अंतर्गत मग्रारोहयोमध्ये बीड तालुक्यातील वैयक्तिक लाभार्थ्यांचे गायगोठा, वैयक्तिक जलसिंचन विहीर, शेततळे कामाचे सन २०२३-२४ मधील ७४०० वर्ककोड डिलीट झालेले आहेत. सदरील वर्ककोड हे कोणत्या आधारे डिलीट झाले याची माहितीही दिली जात नाही. तसेच डिलीट झालेले वर्क कोड हे पुनश्च सन २०२५-२६ मध्ये काढलेले ऑनलाईन पोर्टलवर दिसून येत आहेत. गटविकास अधिकारी अशोक राठोड व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुशिल जामकर यांनी संगनमत करून लाभार्थ्यांकडून पैसे घेवून डिलीट झालेले वर्ककोड सन २०२५-२६ मध्ये कुठलेही शासन आदेश नसताना काढल्याचे दिसून येत आहे, सदरील अधिकारी पैसे घेवून फक्त मर्जीतील लोकांचेच वर्ककोड काढत आहेत व उर्वरीत ७४०० लाभार्थ्यांचे वर्ककोड काढण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे, अशी तक्रार दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी पालकमंत्री अजीत पवार यांच्याकडे केली होती. यानंतर तातडीने यंत्रणा हलली असून दि.९ डिसेंबर रोजी वादग्रस्त ठरलेले गटविकास अधिकारी अशोक राठोड यांच्याकडे असलेला पदभार अनिरूध्द सानप यांच्याकडे देण्यात आला आहे.बळीराम गवते यांनी शेतकरी, सामान्य नागरिक यांचे हीत लक्षात घेवून कामचुकारपणा आणि चुकीचे काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांची तक्रार केली होती.














