बीड: मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून बीड नगर पालिकेत एकाच घराण्याची मक्तेदारी राहिलेली असून त्यांनी बीड शहराचा विकास सोडा बिंदूसरा धरणातील फुकट मिळणारे पाणी देखील केवळ नियोजनाअभावी नागरिकांना आठ दिवसाला दिले नाही. यामुळे बीडचे मागासलेपण घालवून विकशीत शहर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना, शिवसंग्रामचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार प्रेमलता पारवे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, बीड नगर परिषदेवर वर्षानुवर्षे एकाच घराण्याची सत्ता राहिलेली आहे. पालिकेची सत्ता हाती आल्यानंतर शहराचा विकास करणे अपेक्षित होते, परंतु करण्यात आलेले नाही. शहरात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभिर आहे. तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिकांना नाकाला फडके लावून फिरण्याची वेळ आलेली असून पावसाळ्यात याच नाल्याचे पाणी अनेक गरिबांच्या घरात शिरते. परिणामी, हे पाणी नाकातोंडातही जाते. या कारणाने नागरिक आजारी पडतात. असे असले तरी याकडे पालिकेत सत्ताधारी असलेल्या सत्ताधारी कुटूंबाने याबाबत गांभिर्याने घेतलेले नाही. कचऱ्यासोबत पाण्याचा प्रश्न देखील गंभिर असून भरपावसाळ्यात बीड शहरात पंधरा दिवसाला पाणी दिले जात आहे. तसे पाहिले तर बीडला बिंदूसरा पात्रातून फुकटात बीडपर्यंत पाणी येते. केवळ पालिकेचे नियोजन नसल्याने शहरात पावसाळ्यात पंधरा दिवसाला आणि उन्हाळ्यात तर ३० आणि ४५ दिवसाला पाणी देण्यात आलेले आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचे पैसे पाणी विकत घेण्यातच खर्च होत आहेत. यामुळे भविष्यात अशी वेळ येऊ नये, यासाठी आता वर्षानूवर्षे सत्ता असलेल्या आणि बीडला मागास ठेवणाऱ्याना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. बीड नगर पालिका निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री, तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसंग्राम एकत्रितपणे निवडणूक लढवित आहेत. अजित दादा पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी बीड शहरातील नाट्यगृह, जिल्हा क्रिडा संकूल, कंकालेश्वर आदि महत्वाच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी दिलेला आहे. शहराचा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.विजयसिंह पंडित अशा खमक्या नेतृत्वाची गरज असून शहरातील मतदारांनी शहराच्या विकासासाठी घडीला मतदान करावे, असे अवाहनही बळीराम गवते यांनी केले आहे.
















