बीड प्रतिनिधी : डॉ.योगेश, डॉ.सारिका हे राजकीय संकटात अडकले होते. त्यांना वाट दाखवली होती, परंतु ती वाट आमच्याच पक्षापर्यंत येऊन थांबेल, असे कधी वाटले नाही. त्यांच्या माध्यमातून भाजपने सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे यांना संधी दिली. मी राज्याची पर्यावरण मंत्री असल्याने शहरातील स्वच्छता, पाणी, पर्यावरण प्रश्नावर प्राधान्याने काम करणार आहे. वकील, डॉक्टरांचे प्रश्नही अग्रक्रमाने सोडविले जातील. त्यासाठी शहरातील सर्व सुजान डॉक्टर, वकील संघटनांनी डॉ.ज्योती रविंद्र घुंबरे (घोमरे) यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन भाजपच्या सचिव, पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.
बीडच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार डॉ.ज्योती रविंद्र घुंबरे यांच्या प्रचारार्थ डॉक्टर व वकील संघाचा संयुक्त मेळावा बुधवारी (दि.२६) आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, डॉ.सारिका क्षीरसागर, शहराध्यक्ष अशोक लोढा, डॉ.आदित्य सारडा, देविदास नागरगोजे, वकील संघाचे प्रभारी अध्यक्ष ॲड.रघुनाथ देशमुख, सचिव ॲड.एस.आर.काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनंत मुळे, सचिव डॉ.अमोल गीते, एचआयएमएचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव, ॲड.महेश गर्जे, सचिव डॉ.सतीश लड्डा, भाजप डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अभय वनवे, भालकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.जयंत राख, एनआयएमएचे अध्यक्ष डॉ.अजित जाधव, सचिव डॉ.रमेश घोडके, ॲड.संगीता धसे, डॉ.रवींद्र घुंबरे यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने डॉक्टर व वकील उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पाणी पुरवठा व रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासकामांचा हिशोब मांडण्याची सवय नसली तरी बीडच्या विकासासाठी आपण पूर्णपणे समर्पित आहे. डॉ.ज्योती घुंबरे ह्या सुसंस्कृत व सुशिक्षित चेहरा आहेत. निवडणुकीच्या काळात जात व धर्माच्या मुद्द्यांवर चर्चा होणे दुर्दैवी आहे. परंतु, महिलांना संधी देणारे पोषक वातावरण बीडमध्ये निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. बीडला बदनाम करणाऱ्यांविरोधात आवाज उठवून त्यांना हद्दपार केले पाहिजे, असेही ठणकावून सांगितले. राजकारणात खस्ता खाऊनही आम्ही कार्य करत आहोत. कमळावरच राजकारण व समाजकारण सुरू राहील, असे त्या म्हणाल्या. सुशिक्षित व सुसंस्कृत डॉ.ज्योती घुंबरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या संदर्भातील संकटांचा उल्लेख करताना पंकजाताईंनी सांगितले की, जुन्या पक्षात असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. संघर्ष कितीही मोठा असला तरी सत्याची वाट सोडू नका, असा सल्ला त्यांनी दिला. डॉक्टर व वकिलांनी मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, अशी ग्वाही देत भाजपच्या डॉ.ज्योती घुंबरे यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला संविधान दिनानिमित्त संविधान पुस्तकेचे पूजन करण्यात आले. तसेच, २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी शहरातील डॉक्टर, वकिलसांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बीड नगरपरिषदेच्या सभागृहात कमळ फुलविणार -डॉ.योगेश क्षीरसागर
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मेळाव्यात बोलताना म्हटले की, पंकजाताई मुंडे ह्या माझ्या संकटमोचक असून नेहमीप्रमाणे संकटसमयी पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांचे नेतृत्व बलाढ्य आहे. विरोधकांकडे जात, धर्मपलिकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरवासीयांची सेवा केली म्हणूनच बीडकरांनी त्यांना तब्बल ३५ वर्षे नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली २ टप्प्यात २०० कोटी रुपयांचे रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून अनेक विकासकामे झाली आहेत. बीड शहर शांत व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. दोन समाजांमधील तेढ वाढत असल्याने पंकजाताईंच्या पुढाकारातून ते कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मागील ३५ वर्षांपासून आपण निवडून येत असून वारंवार पराभूत होणारे लोक आता बीडमध्ये येऊन आम्हाला धडे देत आहेत. यांचा उद्देश विकास नसून केवळ स्वार्थ आहे. ‘गेवराईचे पार्सल परत पाठवू’ आणि ‘बीड नगरपरिषदेच्या सभागृहात निश्चितच कमळ फुलवू’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंकजाताईंच्या हस्ते डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये माने कॉम्प्लेक्स येथे भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार डॉ.सारिका क्षीरसागर व आदित्य (सनी) माने यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉ.योगेश क्षीरसागर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे, नवनाथ शिराळे, शहराध्यक्ष अशोक लोढा, मुन्ना फड, संग्राम बांगर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर पंकजाताईंनी ॲड.आप्पाराव जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यादरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

















