गेवराईकरांची करमणूक होत असली तरी सामान्य मतदार विकासाला मत देईल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहिरनामा प्रकाशनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जाहिरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषद निवडणुकीसाठी जाहिरनामा प्रकाशित केला, यावेळी भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जेष्ठनेते एस.वाय. अन्सारी, समदभाई आत्तार, शाहीर रामभाऊ मुळे, सुमंतराव मुळे, डी. यु. कांडेकर, मनोहर पिसाळ, दिलीप गंगवाल, दादासाहेब चौधरी, रविंद्र बोराडे, भाऊसाहेब नाटकर, दिपक आतकरे, महेश दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, विरोधकांनी वीस वर्ष नगर परिषदेची सत्ता भोगली त्या काळात यांना विकास कामे करता आली नाहीत, म्हणुन निवडणुक प्रचारा दरम्यान लोकांची दिशाभुल करुन आमच्या नावाने शिमगा करत आहेत. त्यामुळे फक्त लोकांची करमणुक होत असुन नागरीकांना आता शहराचा विकास पाहिजे म्हणुनच आम्ही विकासाच्या मुद्यावर ही निवडणुक लढत आहोत. सत्तेच्या काळातील निष्क्रियतेमुळे पवार आणि बदाम यांना एकत्र येण्याची वेळ आली. दोन्ही विरोधक का एकत्र झाले ? असा सवाल आजही मतदार विचारत आहेत.
महेश दाभाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. शितलताई आणि त्रिंबक पवार यांच्या सुविद्य पत्नीमध्ये ही निवडणुक होत आहे, हे विरोधक विसरले आहेत की काय ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. यांनी बांधलेल्या नाट्यगृह इमारतीचे भुतबंगल्यात रुपांतर झाले आहे, त्याचे उद्घाटन करण्याचे धाडस सुद्धा सत्तेच्या काळात यांनी केले नाही. शहराच्या विकासाचे आमच्याकडे व्हिजन आहे. केलेल्या कामाचा लेखाजोखा घेवुन आम्ही जनतेच्या दारात जात आहोत. महेश दाभाडे सारखा हक्काचा माणुस शहराच्या हितासाठी सदैव उभा राहिल याची सर्वांना खात्री आहे. कोविड संक्रमणाच्या काळात हा तरुण लोकांच्या सेवेत होता मात्र त्या संकटकाळात मदत मागायला आलेल्या लोकांना यांनी पोलीस बोलावुन हाकलले होते. गावच्या पाटलांनी गावाला लुटायचे नसते असेही यावेळी अमरसिंह पंडित यांनी सांगितले.
![]()

















