महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी, खा.सोनवणेंनी मानले गडकरींचे आभार
बीड: बीड जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण व्हावे, दर्जेदार रस्ते होऊन दळणवळणाला चालना मिळावी, यासाठी खा.बजरंग सोनवणे प्रयत्न करत असून जिल्ह्यातील तीन रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून ४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने दळणवळणाला चालना मिळणार आहे.
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी खा.बजरंग सोनवणे हे अथक प्रयत्न करत आहेत. रेल्वे, विमानतळासोबत जिल्ह्यातील रस्त्यांची सुधारणा व्हावी, दर्जेदार कामे व्हावीत आणि अर्धवट असलेली कामे पुर्ण करावेत, यासाठी ते वारंवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून पाठपुरावा करत आहेत. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून उंदरी- जानेगाव- कुंबफळ- येडेश्वरी साखर कारखाना ते रामा ६४ रस्ता सुधारणा करणे या कामासाठी २० कोटी, आपेगाव कारण- पिंपरी-निमगाव आर्वी-पाडळी-रायमोहा-तांबाराजुरी रस्ता रामा ६२ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १० कोटी रूपये तर अंबाजोगाई-मांडवा-मांडखेल-नात्रा, कोडगाव रस्ता रामा २३५ मध्ये नाली संरक्षण भित व पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी १० कोटी रूपये केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्यांसाठी खा.सोनवणे यांनी भेट घेवून पत्र दिले होते. दरम्यान, केंद्रीय सीआरआयएफ योजनेंतर्गत ४० कोटींच्या निधीस मंजूरी मिळाली असून यानिधीमुळे बीड जिल्ह्यातील महत्वाच्या रस्ते उन्नतीकरणे व विकासकामांना आता गती मिळणार आहे. या सकारात्मक निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार, अशी शब्दात खा.बजरंग सोनवणे यांनी भावना व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील या तिनही रस्त्यांची अत्यंत अवश्यकता आहे. रस्त्यांची सुधारणा व्हावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. जनभावना लक्षात घेवून खा.सोनवणे यांनी रस्त्याचा प्रश्न लावून धरला होता. अखेर या रस्त्यांच्या सुधारणासाठी निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.