बीड: ९ डिसेंबरला मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणातून हत्या झाली. यानंतर ११ डिसेंबर या तारखेला या हत्येशी संबधित असलेल्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर दि.१२ डिसेंबर रोजी माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आरोपी निघून गेला, असा खळबळजनक आरोप खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपाने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
दि.१३ डिसेंबर रोजी केज येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते. त्याआधी खा.सोनवणे यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटूंबियांच्या आंदोलनास भेट दिली होती. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख, दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, दि.२८ मे रोजी या खंडणीच्या प्रकरणाला सुरूवात झाली. यानंतर २९ नोव्हेंबरला पुन्हा खंडणी मागितली. पुढे दि.६ डिसेंबर रोजी खंडणीसाठी अवादा कंपनीच्या परिसरात वाद झाला. याच वादाचा राग मनात धरून दि.९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला. यानंतर दि.११ डिसेंबर रोजी खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो. पुढे दि.१२ डिसेंबर रोजी हाच आरोपी माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो आणि तिथून निघून जातो. इतकी दहशत पोलीस प्रशासनावर होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मी पहिल्याच बाईटमध्ये मीडियाला म्हटलं होतं की, तिसऱ्या आरोपींचे कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागतंय का बघा?, कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होतं. पुढे हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचं सापडलं. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो. खंडणीच्या आरोपीवर ११ तारखेला गुन्हा दाखल झाला. मात्र, १२ तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी अन् पोलीस अधिकारी यांची भेट झाली. हे खात्रीने सांगत आहे. म्हणजे, पोलिसाला तिथं मध्ये बसवून तो आरोपी निघून गेला का? असा सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला. याच बरोबर वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे, तो कुठल्या पदावर आहे हे मला माहिती नाही. पण, त्यांनाही पोलीस गार्ड आहेत, हे गार्ड आरोपीसोबत कसे काय? आणि आरोपी पळून जाताना पोलिस गार्ड काय करीत होते ? असे सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले. ११ डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली. ३१ डिसेंबरला अटक होईपर्यंत २१ दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सह-आरोपी का केलं जात नाही, असेही खा.सोनवणेंनी म्हटलं आहे.
००
मुख्यमंत्र्यांना भेटूनही एसआयटीचे अधिकारी तेच
संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना पोलीस प्रशासनावर भरवसा राहिलेला नाही. त्यांनी एसआटीमध्ये आरोपींच्या मनावर अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांना वाटत असावे, यामुळे एसआयटीतील अधिकारी बदलावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे भेटून केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण द्याल ती नावाचे अधिकारी देतो, असे म्हटले होते. परंतु अद्याप ते अधिकारी बदलले नाहीत, असेही खा.सोनवणे यांनी म्हटले.
त्यांची नावे जाहिर करा
खंडणी आणि खून हे प्रकरण एकमेकांशी संबधित आहेत. या प्रकरणात खंडणीतील आरोपींशी ज्यांचे संबंध आहेत, अशा अनेकांना एसआयटीने चौकशीसाठी बोलविले होते. त्या सर्वांची नावे जाहिर करण्यात यावीत. त्या लोकांचे आरोपींशी काय संबंध आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. याच बरोबर खून आणि खंडणीतील आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावे, असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.