पोलीस संरक्षणासह पूर्णवेळ कॅमेरा सर्व्हेलन्स देण्याची मागणी
परळी वैद्यनाथ – उद्या दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्या अनुषंगाने परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण व शासकीय कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, अशी आगळी वेगळी मागणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
परळीतील प्रत्येक निवडणूक अत्यंत शांततेत पार पडते, मात्र मागील काही वर्षांचा अनुभव पाहता काही उमेदवार व कार्यकर्ते आम्हाला अडवणूक झाली, मारहाण झाली, हल्ला झाला, अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करत असतात. त्यात काहीच तथ्य नसते परंतु त्यातून परळी व पर्यायाने बीड जिल्ह्याची बदनामी होते, त्यामुळे सर्वच प्रमुख उमेदवारांसाठी पोलीस संरक्षण व कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे, संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठीही व्यापक प्रयत्न व्हावेत. कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच असा काही प्रकार घडल्यास त्याचे चित्रीकरण केल्याने पोलिसांकडे दोषसिद्धी साठी ठोस पुरावा हातात असेल, त्यामुळे पोलीस संरक्षण व शासकीय कॅमेरामन सर्व प्रमुख उमेदवारांच्या सोबत असावा, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
धनंजय मुंडेंनी विरोधी उमेदवारासह जनतेचे व कार्यकर्त्यांचे मानले आभार
दरम्यान मागील एक महिन्यापासून निवडणूक रणधुमाळी, प्रचार इत्यादी सर्व बाबी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडल्या. त्याबाबत धनंजय मुंडे यांनी विरोधी उमेदवारांसह जनतेचे व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच सर्वांनी मिळून सबंध मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पाडावी, असे आवाहनही केले आहे.