परिवर्तन केले तरच गेवराईचे प्रश्न सुटतील – पूजाताई मोरे
गेवराई – आपल्या भागातील प्रश्न आजपर्यंत सुटले नाहीत, प्रस्थापित घराण्यांनी तुम्हाला वाटेल तसे वागवून घेतले आहे. आपण त्यांना काही विचारत नाही आणि ते आपल्याला काही सांगत नाहीत, हे किती दिवस चालायचे ? गेवराई मतदार संघाचा विकास करायचा असेल तर परिवर्तन करावेच लागेल, यासाठी माझ्यासारख्या तुमच्या हक्काच्या लेकराला मतदानरुपी मदत करा आणि तुमचा स्वतःचा आवाज विधानसभेत पाठवा, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूजाताई मोरे यांनी मतदारांना केले.
अवघ्या आठ दिवसांवर मतदान येऊन ठेपले असून, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार पूजाताई मोरे यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्या आपली भूमिका पटवून देत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांची जाहीर सभा नुकतीच झाली असून, यामुळे मतदार संघातून पूजाताई मोरे यांना प्रचंड मोठा पाठिंबा मिळतो आहे. पूजाताई मोरे यांनी तालुक्यातील केकत पांगरी, रोहितळ, बेलगुडवाडी, ठा.आडगाव, कोलतेवाडी, जातेगाव, गोळेगाव आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी पूजाताई मोरे आक्रमक भाषण करताना म्हणाल्या की, परिवर्तन ही काळाची गरज आहे, परिवर्तन केल्याशिवाय तालुक्याचा विकास होऊ शकणार नाही. आजही मूलभूत प्रश्न तसेच पडून असून, पंडित -पवार ते प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. केवळ दहशतीचे राजकारण करून त्यांनी आमदारकी मिळविल्या असून ती दहशत आता उलथून टाकण्याची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या की, शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा. आमचे दुर्दैव आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलो आहोत, पंडित, पवार यांचे नशीब चांगले आहे जे मोठ्या घरात जन्माला आले आहेत. आपल्या नावाच्या जोरावर त्यांनी आमदारकी मिळविल्या कामे मात्र काहीच केले नाही. तालुक्यातील सगळे मूलभूत प्रश्न तसेच पडून आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी कारखान्याचा वापर केला. केवळ कारखान्यामधून विकास साधता येत नाही. मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी भरीव कामाची गरज आहे. कष्टकऱ्यांना आणि निराधारांना त्यांचा हक्क देण्याची गरज आहे. आमदारकी ही शोक म्हणून मिळवायची नसते आणि वापरायचीही नसते असे त्या म्हणाल्या. यासाठी परिवर्तन होण्याची गरज आहे आणि परिवर्तन झाले तरच आपल्या भागाचा विकास होईल असे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले.
गेवराईचे आमदार आरक्षणासह
शेतकऱ्याचा प्रश्न मांडत नाहीत-
गेवराई मतदार संघाचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहेत. त्या समस्या सोडविणे लांबच, मात्र त्या समस्या मांडण्याचे काम सुद्धा आमदार करीत नाहीत. प्रश्न मांडले तरच ते सुटत असतात, मात्र आमदार प्रश्नच मांडत नसतील तर ते सुटणार कसे ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत आरक्षणा विषयी कधीही आमदार बोलत नाहीत. आरक्षणावर त्यांनी त्यांची भूमिका यापूर्वीच जाहीर करायला हवी होती, मात्र तसे त्यांनी केले नाही. केवळ मताचे राजकारण सुरू असून, निवडून येणे आणि आमदार होणे एवढेच या लोकांचे ध्येय असल्याची टीका पूजाताई मोरे यांनी बोलताना केली.
चौकट –
प्रस्थापित राजकारण्यांना हद्दपार
करण्याची जबाबदारी मतदारांची –
गेवराई तालुक्यामध्ये प्रस्थापित घराण्याचे बिनकामाचे तण वाढले आहे. हे बिनकामाचे तण काढून टाकताना परिवर्तन घडवावे लागेल. यासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी ठरविले तरच परिवर्तन घडू शकते. प्रश्न सोडवायचे असतील, विकास आपल्या दारी आणायचा असेल तर मतदारांनी परिवर्तन घडवून आणले पाहिजे, अशी जाणीव करून देत पूजाताई मोरे यांनी आपल्या परिसरातील विकासासाठी परिवर्तनाची किती गरज आहे हे ग्रामस्थांना यावेळी पटवून दिले.