अंबाजोगाई/प्रतिनिधी: केज मतदार संघातील एकाधिकारशाही संपविण्यासाठी बहुजन विकास मोर्चा महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी असल्याचे या पक्षाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी गुरुवारी (दि.१४) येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, केजचे हारूनभाई इनामदार, बबन लोमटे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बब्रुवान पोटभरे, लोकजनशक्ती पक्षाचे राजेश वाव्हळे, प्रहारचे फिरोज शेख, अशोक गंडले, विनोद शिंदे, महादेव आदमाने यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाबुराव पोटभरे विद्यमान आमदाराचे नाव न घेता म्हणाले, मागील ५ वर्षात केज मतदार संघात हुकुमशाही, घराणेशाही, मक्तेदारी व एकाधिकारशाही असल्याची टीका करून, ही हुकुमशाही संपविण्यासाठी सर्वसामान्य जनता पृथ्वीराज साठे यांच्यासोबत आहे. या मतदार संघात साडेतीन हजार कोटीची कामे झाली मात्र यातील अनेक कामे कागदावर असल्याचा आरोपही पोटभरे यांनी केला. पृथ्वीराज साठे हे जनसामान्याचे उमेदवार असून केजमध्ये झालेल्या मेळाव्यातून साठे त्यांच्या विजयावर शिक्का मोर्तब झाल्याचा दावा हारून इनामदार यांनी केला. यावेळी बब्रुवान पोटभरे, राजेश व्हावळे, फिरोज शेख यांनी भुमीका मांडली. केज मतदार संघात अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने बुट्टेनाथ साठवण तलाव, अंबाजोगाईत औद्योगिक वसाहत (एमआयडीसी), जिल्हा निर्मीती असे विविध प्रश्न यांना सुटले नाहीत, असे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पृथ्वीराज साठे प्रयत्न करतील, असा विश्वास राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.
साठेंचा जाहीरनामा
केजचा पाणी प्रश्न सोडविणे, नेकनुरला तालुक्याचा दर्जा, अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, काळवटी तलावाची उंची वाढविणे, यासह विविध जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्याचा १९ कलमी जाहिरनामा डॉ.नरेंद्र काळे यांनी मांडला.