*जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका ; नमिताताईंच्या पाठिशी उभा राहून हात बळकट करा*
*अंबाजोगाईच्या जाहीर सभेत आ. पंकजाताई मुंडे या
अंबाजोगाई।दिनांक १२।
माझा जिल्हा पुरोगामी, सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणूकीत तुम्हाला विकासाची दृष्टी समोर ठेवून मतदान करायचे आहे. जिल्हयाच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका. भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहून माझे हात बळकट करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज इथं मतदारांना केलं.
केज महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ शहरात आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व आ. पंकजाताई मुंडे यांची संयुक्त सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, उमेदवार नमिताताई, युवा नेते अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अंबाजोगाईची मी नात असल्याने या शहराशी माझा ऋणानुबंध आहे. हा जिल्हा मुंडे-महाजनांच्या तालमीत वाढलेला जिल्हा आहे. मुंडे साहेबानी एकेक माणूस जोडून ठेवला आहे. या जिल्ह्याने १९८० पासून कमळाचं फुल सोडलेलं नाही असं सांगून पंकजाताई म्हणाल्या, ही निवडणूक माझ्या किंवा नमिताच्या नाही तर तुमच्या विचाराच्या प्रतिष्ठेची आहे. पालकमंत्री असतांना जिल्हयासाठी खूप चांगल काम केल. सर्व घटकांचा समान विकास करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत माझा पराभव झाला पण तो पराभव मी आता विसरले आहे. मी मतांनी हरले पण मनाने हरले नाही आणि पुन्हा कामाला लागले. मी महाराष्ट्रातचं रहाव, दिल्लीत जावू नये अशी तुमचीच इच्छा होती म्हणून विधानपरिषदेची आमदार झाले.मी आता कोण्या एका मतदारसंघाची आमदार नाही तर पूर्ण जिल्हयाची आमदार आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहे.
विकासाचा सूर्य मावळू देऊ नका
महाराष्ट्रात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आले तरच जिल्ह्याचा विकास साधता येईल. फेक नरेटिव्ह पूर्णपणे नेस्तनाबूत करा.विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका, त्यासाठी नमिताताई मुंदडा यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा. तुतारीला पराभूत करण्यासाठी कमळाचं बटन दाबून नमिताताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करा असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केलं.