बीड प्रतिनिधी : अहिल्यानगर – बीड – परळी रेल्वे मार्गावरील बीड रेल्वे स्थानकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी माजी सैनिक अनुरथ सोपान वीर यांचे गेली चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र अन्नत्याग उपोषण चालू असून, त्यांनी जलत्यागही सुरु केला आहे. प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी. वीर यांना ठोस आश्वासन देऊन, उपोषण मागे घेण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर माजी सैनिक अनुरथ वीर यांचे चालू असलेल्या उपोषण स्थळी राजेंद्र मस्के यांनी भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बीड जिल्हा हा मागास जिल्हा, गतिमान विकासासाठी रेल्वेची गरज असते. अहिल्यानगर – बीड – परळी हा रेल्वे मार्ग होण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, पत्रकार, तरुण युवक अशा विविध क्षेत्रातील अनेकांनी पुढाकार घेऊन, रेल्वे मंजुरीसाठी आंदोलने केली. जनतेची मागणी लक्षात घेऊन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्ग मंजुरीसाठी स्वत: पुढाकार घेतला. केंद्र व राज्य सरकारने संयुक्तिकपणे भरीव आर्थिक तरतूद केली. पुढे तत्कालीन खासदार प्रितमताई मुंडे यांनी भाजपा महायुती केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून निधी आणला. अहिल्यानगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, पुढील काम अंतिम टप्प्यात आहे.
आंदोलनातून मंजूर झालेला रेल्वे मार्ग आणि आता बीड रेल्वे स्थानकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे नाव द्यावे यासाठी आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. माजी सैनिक अनुरथ वीर यांचे उपोषण चालू असून त्यांची प्रकृती गंभीर होऊ लागली आहे. निवृत्त माजी सैनिकाच्या तीव्र उपोषण आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. अशी मागणी राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केली आहे.