राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र
आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश
बीड प्रतिनिधी :- बीडमधून जाणारा औरंगाबाद-येडशी राष्ट्रीय महामार्ग नऊ वर्षांपुर्वीच पुर्ण झाला आहे. या महामार्गावर बीड शहराच्या बाजुने 12 कि.मी. चा बायपास गेला आहे. परंतु शहरात प्रवेश होणार्या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आवश्यक असताना या ठिकाणांवर उड्डाणपूल नाही. तसेच परळी रोड, नाथापुर रोड, इमामपुर रोड या ठिकाणी स्लिप सर्विस रोडही करण्यात आलेले नाही. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार अधिवेशनात, शासनस्तरावर याबाबत पाठपुरावा केला होता, तरीही यावर उपाय न झाल्याने शेवटी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आता खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून येणार्या वार्षिक अर्थसंकल्पात उड्डाणपूल आणि आवश्यक ठिकाणी स्लिप सर्विस रोड करणार असे शपथपत्र घेतले आहे.
औरंगाबाद-येडशी राष्ट्रीय महामार्ग मागच्या नऊ वर्षांपुर्वीच पूर्ण झालेला आहे. बीड शहराच्या बाजुने एकूण 12 कि.मी. चा बायपास गेला आहे. बीड शहरात येण्यासाठी दोन्ही बाजूंनी चौक आहेत. इंडियन रोड काँग्रेस च्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्याच्या छत्रपती संभाजी महाराज चौक बार्शी रोड आणि महालक्ष्मी चौक जालना रोड या दोन्ही ठिकाणांवर उड्डाणपूल आवश्यक आहे. तसेच परळी रोड, नाथापूर रोड राज्यमार्ग या ठिकाणी 11 सप्टेंबर 2018 रोजी स्लिप सर्व्हिस रोड मंजुर आहे. परंतु अद्यापपर्यंत याचे काम सुरू झालेले नाही. तसेच इमामपुर रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग क्र.74 असून या ठिकाणीही स्लिप सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. तरीही याठिकाणचा स्लिप सर्व्हिस रोड मंजुर करण्यात आला नाही. आ.संदीप क्षीरसागर यांनी या बाबत राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून इमामपुरला स्लिप सर्व्हिस रोड मंजुर करून या भागातील शेतकर्यांच्या दळणवळणाची सोय करावी अशी मागणी दि.4 डिसेंबर 2019 रोजी पत्राद्वारे केली होती. यावर मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला इमामपुर रोड या ठिकाणी स्लिप सर्व्हिस रोड मंजुर करावा अशी सूचना दिली होती. परंतु तरीही इमामपुर रोडला स्लिप सर्व्हिस रोड दिला गेला नाही.
तसेच बीड आणि गेवराई उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक औरंगाबाद यांनी राष्ट्रीय महामार्ग नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव नागपुर प्रादेशिक कार्यालयाने मंत्रालयाकडे पाठवला होता. परंतु राष्ट्रीय महामार्ग कार्यालय दिल्ली यांनी गेवराई उड्डाणपूलाचा प्रस्ताव मंजूर केला पण बीडचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला. बीड शहरासाठी आवश्यक असलेले स्लिप सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुल वारंवार पाठपुरावा करून देखिल मंजुर होत नसल्याने शेवटी आ.संदीप क्षीरसागर यांनी मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदरील याचिका क्रमांक 1176 ऑफ 2024 च्या दि.30 जानेवारी 2024 रोजीच्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दि.23 फेब्रुवारी 2024 पर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद प्रकल्प संचालक श्री.रविंद्र इंगोले यांनी दि.8 मे 2024 रोजी न्यायालयात शपथपत्र दाखल करून आम्ही येणार्या आर्थिक वर्षात या कामांना मंजुरी घेऊन काम पूर्ण करु असे सांगितले. सदरील याचिकेवर दि.28 जून 2024 रोजी अंतिम आदेश होणार आहे. दरम्यान या विषयात आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
दोन वर्षांत 17 लोक मृत्युमुखी
बीड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या, छत्रपती संभाजी महाराज चौक आणि महालक्ष्मी चौक याठिकाणी केवळ उड्डाणपूल नसल्याने गेल्या दोन वर्षांत तब्बल 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर असंख्य लोक याठिकाणी अपघात होऊन जखमी झाले आहेत.
चौकट
राजकारणातून लोकांचा जीव धोक्यात!
गेवराई आणि बीड या दोन्ही शहरांसाठी उड्डाणपूल प्रस्तावित असताना गेवराईचा उड्डाणपूल मंजूर होतो पण बीडचा नाही! अशी परिस्थिती राजकीय मतभेदातून झाली आहे. गेवराई चे आमदार भाजपा चे आहेत आणि बीडचे आमदार विरोधी पक्षाचे आहेत हेच यामागचे बहुतेक कारण असावे.