– जय महेश कारखान्यावरील बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
माजलगाव : मला आधीपासून प्रश्न पडला होता की बजरंग बप्पा नेमकी कशाची शेती करतात? पण काल आपल्या सगळ्यांना कळले की त्यांची शेती नेमकी कशाची आहे? अशा उमेदवाराला तुम्ही शेतकरी पूत्र म्हणून मतदान करणार आहात काय? तुतारीवाल्याकडून बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही. ते केवळ मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. आंदोलनामुळे कुणबी नोंदी शोधून त्याआधारे कुणबींची प्रमाणपत्रं वाटप करण्यात आली. अन् त्या प्रमाणपत्राचा वापर ज्याचे आरक्षण आंदोलनात काडीचेही योगदान नाही त्या बजरंग सोनवणे यांनी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ओबीसी उमेदवार म्हणून फॉर्म भरण्यासाठी केला. म्हणजे निवडणूक लढवायला ओबीसी अन् इकडे मात्र मराठा समाजाची मते मागतात.
सुज्ञ मतदार असल्या जातीपातीच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत. ते एकमुठीने पंकजाताई मुंडे यांना विजयी करतील, असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ते माजलगाव येथे जय महेश कारखान्यावर कर्मचार्यांशी संवाद साधत होते.
यावेळी कारखान्याचे बालू जाधव, एम.डी. प्रसाद बाबू, पुरूषोत्तमजी, लक्ष्मण तात्या पौळ, राजाभाऊ पौळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आपल्याला जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासाची ब्ल्यू प्रिंट पहावी लागेल. इथली माती सुपिक आहे. परंतु इथे शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्या काळात कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आपल्याला नाशिकच्या धरणात आणायचे आहे. तिथून ते जायकवाडी धरणात तिथून ते माजलगाव धरणात अन् पुढे परळीच्या तांदळवाडी येथे नव्याने होणार्या तलावात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 42 टीएमसी पाणी जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी 1 लाख 17 हजार कोटी रुपये खर्चासाठी तत्वतः मान्यता देखील देण्यात आली आहे.
यातील 50 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळाले तर या कामाला तातडीने सुरूवात देखील होणार आहे. हा प्रकल्प पुर्णत्वाला गेला तर जिल्ह्याची 8 लाख हेक्टर जिरायती शेतीपैकी 7 लाख हेक्टर शेती बागायती होणार आहे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार हवे. अन् जिल्ह्याचा खासदार देखील त्याच विचाराचा असायला हवा, आपल्या तुतारीवाल्या उमेदवाराला जिल्ह्याची भौगोलिक स्थिती तरी माहिती आहे का? असे देखील मुंडे म्हणाले.
आपल्या शेजारच्या लातुरला रेल्वे कोच बनवण्याची फॅक्ट्री मंजूर झाली. तिचे काम देखील युध्द पातळीवर सुरू आहे. त्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसाच एखादा मोठा रोजगार आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी पंकजाताई केंद्रात प्रयत्न करतील. आणि तसा मोठा प्रकल्प मोदीच जिल्ह्याला देवू शकतात, असे धनंजय मुुंडे म्हणाले.
गेल्या अनेक वर्षापासून आपण रेल्वेने येणार म्हणत आहोत. सध्या ही रेल्वे पाटोदा तालुक्यातील अंमळनेरपर्यंत आलेली आहे. पुढच्या वर्षभरात ती परळीपर्यंत येईल. आपल्याला नुसती रेल्वे पाहीजे नाही तर वंदे भारत एक्स्प्रेस बीड येथून बेंगलोर, हैद्राबाद, मुंबईला धावायला हवी, यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे देखील मुुंडे म्हणाले.
आपल्याला विकासाचे राजकारण करावे लागेल. जात, पात, धर्म यामध्ये कोणाचेही भले होणार नाही. तुतारीने जिल्ह्याचा विकास अजिबात होणार नाही. कोणाच्याही भुलथापांना विनाकारण बळी पडू नका. पंकजाताई मुंडे यांच्या कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले.
*माजलगावसाठी सीडस् उद्योग आणा,*
*जमीन आम्ही उपलब्ध करून देवू*
जय महेश कारखाना ज्यांनी चालवायला घेतला त्यांचा सीडस् उद्योगात मोठा दबदबा आहे. त्यांनी शुगर फॅक्ट्रीबरोबरच माजलगावच्या परिसरात सीडस् उद्योग उभारावा. आपण त्यांना सरकारकडून जमीन उपलब्ध करून देवू, असे अश्वासन ना. धनंजय मुंडे यांनी दिले.
*पंकजाताईंच्या विजयासाठी जीवतोडून प्रयत्न करू- बालू जाधव*
पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जय महेश कारखान्यासाठी मोठे योगदान आहे. अनेक अडचणीच्या काळात त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे कारखान्याच्या भवितव्यासाठी आणि शेतकरी हितासाठी धनंजय मुंडे यांना सहकार्य करण्याचा मी निर्णय घेतला आहे. कोणी काहीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर कोणी विश्वास न ठेवता आपल्याला पंकजाताई मुंडे यांना विजयी करायचे आहे, असे आवाहन बालू जाधव यांनी केले.