शिवसंग्रामच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय
पुणे प्रतिनिधी : जन मागणीच्या आग्रहास्तव डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी बीड लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला परंतु महाआघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या जनतेमधून निवडणूक लढवायचा आग्रह होता त्या जनतेच्या मतांचा आदर करत डॉ. ज्योती मेटे यांनी निवडणूक न लढण्याबाबत भूमिका घेतली यानंतर शिवसंग्राम कोणत्या पक्षाला आपला पाठिंबा जाहीर करेल याची उत्सुकता सर्वांनाच होती दि. २७ एप्रिल रोजी पुणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडलेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर करत शिवसंग्राम तटस्थ राहील अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
याप्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी सह सर्व आघाड्यांचे प्रमुख, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते विनायकराव मेटे यांनी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी केलेला संघर्ष त्याचबरोबर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकासाठीचा लढा आणि त्यांच्या हयातीमध्ये सर्वसामान्यशी कामाच्या माध्यमातून जोडलेली नाळ यामुळे शिवसंग्राम ला मानणारा मोठा वर्ग आहे. २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत विनायकराव मेटे यांचा खूप कमी मताने पराभव झाला होता. त्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत चार जिल्हा परिषद सदस्य तीन पंचायत समिती सदस्य आणि असंख्य ग्रामपंचायती वर आपले सरपंच आणि सेवा सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी बीड मतदार संघावर आपली पकड मजबूत केली होती. या कारणाने शिवसंग्रामच्या भूमिकेकडे राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते आता शिवसंग्रामने आपली भूमिका जाहीर केल्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे वेळ आल्यावरच कळेल.