बजरंग बप्पा सोनवणेंची भाजप, पालकमंत्र्यांवर टीका
बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री, विद्यमान खासदार व त्यांच्या भाजपच्या उमेदवाराने जिल्ह्यात कोणत्याही विकासाच्या योजना राबविल्या नाहीत. रोजगार निर्मितीसाठी नवीन प्रकल्प आणले नाहीत. सिंचन आणि इतर सोयी सुविधा यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्यांच्यावर मतांची भीक मागण्याची वेळ आली आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी करीत त्यांनी मी जिल्ह्यातील मतदारांचा स्वाभिमान जपल्यामुळे मी सन्मानाने लोकशाहीत मतांचे दान मागत असल्याचे सांगितले.
शिरूर कासार तालुक्यात प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे बोलत होते. यावेळी युवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यासह इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी मी भाजप, महायुतीच्या उमेदवारासाठी व माझ्या ताईसाठी मतदानाची भीक मागतोय. असे वक्तव्य एका सभेतून केले होते. त्या वक्तव्याचा बजरंग सोनवणे यांनी समाचार घेताना म्हटले की, जर त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास केला असता रोजगार निर्मितीचे विविध प्रकल्प आणून जिल्ह्यातील बेरोजगारी कमी केली असती. तर त्यांना मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती. मी मात्र स्वाभिमानाने व सन्मानाने मतदानाचे दान मागतो. हा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. असे सांगून स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या सारख्या शेतकरी पूत्रावर बोलणे म्हणजे त्यांची उंची कमी झाल्याचे लक्षण आहे. माझी औकात व लायकी काढणे म्हणजेच हे सामान्य लोकांना हिणविण्याचा प्रकार आहे. मी १९९२ पासून स्थानिक राजकारणात प्रवेश केला. तर पालकमंत्री व त्यांच्या भगिनी या २००९ पासून राजकारणात सक्रिय झाल्या. म्हणजेच माझा राजकीय अनुभव त्यांच्यापेक्षा जास्त आहे. तसेच मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणात प्रत्येक वेळी मी सोबत राहिलो आहे. माझ्या घरात राजकीय वारसा नसेल. मी त्यांच्या सारखा श्रीमंत नसेल परंतु माझी नैतिक उंची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. असल्याचे सांगितले. तर रेल्वे प्रश्नावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मी माझ्या काळात रेल्वे परळीपर्यंत आणील, दुसऱ्या टर्मला उमेदवारी अर्ज भरायला रेल्वेने येईन अशी ग्वाही देत मी जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने इतिहास घडविणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.