उत्सुकता शिगेला; आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
बीड प्रतिनिधी : राज्याच्या विकासाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी बीड शहरातील तरुण, अनुभवी आजी-माजी नगरसेवक आणि नगरपालिकेत उपाध्यक्ष, सभापतीपद भूषवलेले ज्येष्ठ नेते मोईन मास्टर यांच्यासह फारूक पटेल अमर नाईकवाडे जलील पठाण आदींचा गट उद्या दि.5 मार्च रोजी मुंबईत मंत्रालयासमोरील महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृहात
अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 300 वाहनांचा ताफा घेवून पटेल,नाईकवाडे मुंबईकडे रवाना होणार आहेत. या कार्यक्रमात तब्बल 1700 कार्यकर्त्यांचाही पक्ष प्रवेश होणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुडे, माजी आ.अमरसिंह पंडीत यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुंबईत या पक्ष प्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून तीनशे वाहनांचा ताफा आज सकाळीच मोठ्या उत्साहात मुंबईकडे रवाना होणार आहे. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील बदललेल्या राजकीय परिस्थितीत आम्ही सर्व पदाधिकारी कोणतीही भूमिका न घेता संयम ठेवत ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत राहिलो. अशावेळी राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करणारे सक्षम नेतृत्व अजितदादा पवार यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित या नेत्यांनी हा पक्ष प्रवेश सोहळा घडून आणण्यासाठी पुढाकार घेतला. आज तो प्रत्यक्षात साकारत असल्याने आम्हाला आनंद असल्याच्या प्रतिक्रिया पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या आहेत. पक्षप्रवेश सोहळ्यासाठी तब्बल 300 वाहनांचा ताफा घेवून पटेल,नाईकवाडे मुंबईकडे रवाना होणार आहेत. जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांचे नेतृत्व सक्षम असून राज्याचे विकासाचे त्यांचे असलेले व्हिजन समोर ठेवून आम्ही पक्षात प्रवेश करत असल्याच्या प्रतिक्रिया या सर्व पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या आहेत.बीड नगरपालिकेत अनेकवर्ष काम केलेली ही तरुण आणि अनुभवी पदाधिकार्यांची फळी सर्वसामान्यांच्या घरातून पुढे आलेली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या क्षमतेने सिद्ध झालेला हा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये मोठी ताकद मिळणार आहे.
*यांचा होणार प्रवेश*
बीड पालिकेचे माजी गटनेते फारुक पटेल यांच्यासह माजी बांधकाम सभापती अमर नाईकवाडे, मोईन मास्टर, माजी नगरसेवक जलील पठाण, प्रभाकर पोपळे, नसीम इनामदार, भैय्यासाहेब मोरे, शेख शाकेर, अशफाक इनामदार, गणेश तांदळे, शेख सादेक, अल्पसंख्यांक आघाडी माजी जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, अक्रम बागवान, ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स चे जिल्हाध्यक्ष शेख सादेक (अंबानी), शकिल (बिल्डर)खान, इलियास टेलर, अलिम कुरेशी, शेख युनुस, रफीक बागवान, अय्युब खान, शेख अजिम, सय्यद नदीम, बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष अलिम पटेल, रामदास सरवदे, सय्यद रहीम, संतोष क्षीरसागर, शेख इलियास, संभाजी काळे, भैय्या पवळे, बाळु धोत्रे हे सर्व आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.तसेच 1700 कार्यकर्त्यांचाही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
*पदाधिकारी काय बोलणार? उत्सुकता शिगेला*
आज पक्ष प्रवेश करत असलेले हे सर्वच पदाधिकारी मागील काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त होते. बीड नगरपालिकेचे माजी गटनेते फारूक पटेल आणि नगरसेवक तथा माजी सभापती अमर नाईकवाडे हे अभ्यासू आणि आक्रमकतेने भूमिका मांडत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जनसेवक म्हणून शहरात ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळापासून पक्ष वाढीसाठी केलेले काम आणि हे सर्व करत असताना झालेला अन्याय, अशाही स्थितीत पक्षाचे काम पुढे नेताना लागलेले ‘स्पीडब्रेकर’, त्यामुळे बदलावी लागलेली राजकीय भूमिका व त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वगृही परतण्याचा घेतलेला निर्णय याबाबत आज प्रवेश घेत असताना यातील प्रमुख नेते असलेले अमर नाईकवाडे, फारूक पटेल व मोईन मास्टर हे अजितदादा पवार यांच्यासमोर काय बोलणार, आणि अन्यायाला कशी वाचा फोडणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
*फेसबुकवर ‘लाईव्ह’ पाहता येणार पक्षप्रवेश सोहळा*
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.5 मार्च रोजी सायं.5 वाजता मुंबई येथे मंत्रालयासमोरील महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृहात पार पडणार्या पदाधिकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा अमर नाईकवाडे यांच्या फेसबुक पेजवर तसेच फारुख पटेल मित्र मंडळ या फेसबुक पेजवर ‘लाईव्ह’ पाहता येणार आहे. तशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
*बीड शहर सजले*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा वर्ग बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यातच आता बीड नगरपालिकेतील आजी-माजी पदाधिकार्यांची मजबूत फळी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे बळ मिळाले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी मुंबईत होणार्या प्रवेश सोहळ्याचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले असून या पक्षप्रवेश सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
*महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात पक्ष प्रवेश सोहळा*
मुंबईत आज पार पडत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने या कार्यक्रमाच्या स्थळामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मुंबईतील गरवारे हॉल ऐवजी आता हा कार्यक्रम मंत्रालयासमोरील महिला आर्थिक विकास महामंडळ महामंडळाच्या सभागृहात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.