बीड प्रतिनिधी : आर्थिक विवंचनेतून व कुणबी नोंद न सापडल्याने नैऱ्याश्यातून पदवीधर महिलेने आत्महत्त्या केल्याची घटना बीड शहरातील धानोरा रोड परिसरात घडली. शारदा लक्ष्मण कोटुळे (पवळ) वय ४३असे सदरील महिलेचे नाव आहे. पती पत्नी दोघेही उच्चशिक्षित असूनही नोकरी नाही, त्या स्वतः पोष्टात खातेबाह्य कर्मचारी म्हणून तुटपुंजा मानधनावर काम करत होत्या तर सदरील महिलेचे पती लक्ष्मण जिजाबा कोटुळे हे एम. ए. बी. एड. असूनही नोकरी नसल्याने रोजंदारीने काम करत आहेत. अल्पभूधारक त्यातही कोरडवाहू शेती आणि अत्यल्प उत्पन्न त्यात एक मुलगा इयत्ता दहावीत तर एक मुलगा इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे या सगळ्या खर्चाचा ताण आणि मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदी न सापडल्याने मुलांच्या भविष्याची चिंता होती.आपल्याला नोकरी मिळाली नाही आणि आपल्या मुलांनाही मिळणार नाही असे त्यांना नेहमी वाटायचे. अशा अनेक आडचणींचा सामना या कुटुंबाला करावा लागत होता. भविष्यात मुलांचे शिक्षण, भरमसाठ फिस याचं कसं आणि काय करायचं याची मागील महिन्यापासून त्यांच्या कुटुंबात चर्चा होती आणि त्या कायम याच चिंतेत असायच्या. त्यात कुणबी नोंद सापडली तर आरक्षण मिळेल, फिसमध्ये सवलत मिळेल अशी अशा होती पण त्यांच्या नोंदी न सापडल्याने पुन्हा हाती निराशाच आली. शेवटी नैऱ्याश्यातून सदरील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील महिलेच्या पश्चात पती दोन मुले असा परिवार आहे. या दुदैवी घटनेने आधीच संकटात असलेले संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने याची दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी समाजातून होत आहे.