शिवाजीराव दादा पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात तुकोबारायांच्या अभंगावर केले चिंतन
गेवराई प्रतिनिधी : संसारामध्ये कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही तसे संतांची भेट पुण्याई केल्याशिवाय होत नाही. संसार करत असतानाच परमार्थ सुद्धा केला पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे कारण संतांची सेवा सर्वात महत्त्वाचे आहे. एकदा संतांची भेट झाली की जीवनात काही करायचे शिल्लक राहत नाही. संतांची भेट झाली की देवाची भेट झाली असे समजावे असे चिंतन ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांनी केले. शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात कीर्तन सेवा करताना ते बोलत होते.
माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनगरी गेवराई येथे कीर्तन महोत्सव थाटामाटात संपन्न होत आहे. शनिवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्री ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘ कोण पुण्याईचा होईल सेवक ‘ या अभंगावर निरूपण केले. जगनियंत्या परमेश्वराला संत तुकाराम महाराज संताच्या भेटीचे वर्म विचारतात हे प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या कीर्तन सेवेत सविस्तर स्पष्ट केले. त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या विविध ओव्या आणि प्रमाण देऊन त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. आपल्या विनोदी शैलीतून चिंतन करत त्यांनी प्रसंगी चिमटे घेत उपस्थितांना आत्मपरीक्षण करायला लावले. उत्तम पिकासाठी जशी जमिनीची मशागत महत्त्वाची असते तसेच उत्तम संतती निर्माण होण्यासाठी संसार करताना देखील विचारपूर्वक वागावे लागते. जीवनामध्ये समर्पण महत्त्वाचे आहे. हरीकृपा झाली की संतांची भेट होत असते असे सांगून आपण परमार्थ करताना संतांची सेवा सुद्धा केली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. आई वडील आपल्या घरातील देव आहेत, त्यांची भक्ती आणि सेवा करताना कुठे कसर राहू नये हे सांगताना आई आई असते आणि बाप बाप असतो, माय असते तेव्हा माहेरून येताना लेकीची पिशवी कुठल्या ना कुठल्या वस्तूने भरलेली असते पण माहेरी जेव्हा माय नसते तेव्हा लेकीच्या पिशवीत बदल झालेला असतो असे सांगताना उपस्थित भावी भक्त गहिवरून आले होते.
शिवाजीराव दादांचे कार्य महान
याप्रसंगी बोलताना प्रकाश महाराज साठे म्हणाले की, शिवाजीराव दादांनी राजकारण करताना परमार्थ सुद्धा साधला. भक्तीची सांगड घालून त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले म्हणूनच त्यांचे अभिष्टचिंतन असा भक्तिमय सोहळा घेऊन केले जात आहे. गेवराई तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने दादांचे शताब्दी साजरी व्हावी असे सांगून जनतेची सेवा करणारा शिवछत्र परिवार आहे. दादांच्या संस्कारामुळे त्यांचे तीन पुत्र राजकारण , समाजकारण, उद्योग आणि सहकारी क्षेत्रात यशस्वी काम करत अशा भाषेत त्यांनी शिवछत्र परिवाराचे कौतुक केले.
*भक्तीसरगम कार्यक्रमाने*
*भाविक भक्त मंत्रमुग्ध*
==============
सायंकाळी संगीतरत्न बाळासाहेब वाईकर यांचा भक्ती सरगम कार्यक्रम चांगलाच बहरला त्यांनी सादर केलेले विविध अभंग रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. यावेळी त्यांना अरुण कदम यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले.
आजच्या सर्व कार्यक्रमांना जय भवानी कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गेवराई शहरासह ग्रामीण भागातून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.