बीड प्रतिनिधी – बीड शहरासह जिल्ह्यात बर्याच ठिकाणी डेंग्यूची लागण झालेले रूग्ण दिसून येत आहेत. डेंग्यू सारखा साथरोग घातक ठरू शकतो. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यात बर्याच ठिकाणी आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू हा साथरोग असून मोठ्या प्रमाणावर पसरल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण डेंग्यू आजाराने जिवीतहानी झालेल्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे हा साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असून
डेंग्यू आजारावर आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करून नागरिकांना होणारी इजा टाळण्यासाठी प्रयत्न करा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत आ.क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
*चौकट*
*छ.संभाजी नगर, नांदेड येथील घटनेच्या अनुषंगाने जिल्हा रूग्णालयात खबरदारीच्या सुचना*
बीड जिल्हा रूग्णालयात, जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही उपचारासाठी रूग्ण येतात. या रूग्णांच्या बाबतीत कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश, जिल्हा शल्यचिकित्सक यांना छत्रपती संभाजी नगर व नांदेड येथील घटनेच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजी नगर व नांदेड येथील उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांच्या मृत्यूच्या घटना घडल्या असल्याने आ.क्षीरसागर यांनी सुचना दिल्या आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.