छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग आणि धाराशिव जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.