बीड :- मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त आज बीड शहारात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅराथॉनमध्ये युवक युवतींनी उत्साह दाखवत मोठया संख्येने भाग घेतला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनाला सुरूवात केली.
येथील हुतात्मा स्मारकाजवळ मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ- मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच विविध गैरसरकारी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅरेथॉनची सुरुवात हुतात्मा स्मारकापासून ते रिलायन्स पेट्रोल पंप पर्यंत पूर्ण करून पुन्हा हुतात्मा स्मारक पर्यंत करण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधिक पाच युवक, युवती आणि बालकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. सहभागी सर्वच धावकांना प्रमाणपत्र दिले जाईल. जिल्हा प्रशासनातर्फे धावकांसाठी अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.