खंडोजीबाबा देवस्थान लोणी सह विविध देवस्थानांच्या विकासकामांसाठी सुमारे साडे आठ कोटींचा निधी
परळी मतदारसंघातील रेणुकादेवी मंदिर पौळ पिंप्री व दर्गा देवस्थान सिरसाळा येथील विकासाचा शब्द धनंजय मुंडेंनी केला पूर्ण
मुंबई- बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांचा पर्यटन स्थळांच्या दृष्टीने विकास करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रस्तावित केलेल्या विविध देवस्थानांच्या सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या कामांना सन 2021-22 मध्ये मंजुरी देण्यात आली होती, मात्र नंतर त्या कामांवर स्थगिती आली होती. आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून या सर्व कामांवरील स्थगिती उठवण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश पर्यटन विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
शिरूर कासार तालुक्यातील संत खंडोजी बाबा यांचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र खंडोजी बाबा देवस्थान लोणी वारणी येथील विकास कामासाठी चार कोटी 19 लाख रुपये एवढा निधी खर्चास यांतर्गत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळा काका आजबे, रा.कॉ.चे सतिश बडे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता.
परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार पौळ पिंप्री येथील रेणुका देवी देवस्थान व परिसराच्या विकासासाठी 1 कोटी रुपये तसेच सिरसाळा येथील दर्ग्याच्या विकासासाठी 1 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात दिलेल्या आणखी एका शब्दाची पूर्ती केली आहे.
त्याचबरोबर अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी (ता.पाटोदा) येथील सभामंडप बांधकामासाठी 50 लाख रुपये, अंतर्गत रस्त्यांसाठी 35 लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. श्री तारकेश्वर गड येथील सभामंडपचा शब्द देखील पूर्णत्वास नेत 50 लाख रुपये तर श्री क्षेत्र मच्छिन्द्रनाथ गडावरील अंतर्गत रस्ते व वाहन तळासाठी 50 लाख,आईसाहेब संत मीराबाई संस्थान महासांगवी येथील सभामंडपासाठी 50 लाख असे एकूण सुमारे साडे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान या सर्वच देवस्थानच्या विकासाच्या कामास आता गती येणार असून या कामांवरील स्थगिती मागे घेतल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.