बीड प्रतिनिधी : शहरातील नामांकित मूत्र विकार तज्ञ डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सौ.के.एस.के. हॉस्पिटलमध्ये एका रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून त्याच्या पोटातून तब्बल पाऊण किलोचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढून रूग्णाला जीवनदान दिले आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील एका 47 वर्षीय रूग्णाला प्रचंड पोटदुखीचा त्रास होत असल्याने ते शहरातील रूग्णालयात दि.1 सप्टेंबर रोजी दाखल झाले. त्यांनी उपचार घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनाग्राफी केली. यात त्यांच्या पोटात भलामोठा मुतखडा असल्याचे समजले. त्यानंतर ते सौ.के.एस.के. हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्यावर मूत्र विकार तज्ञ डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.6) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेसाठी त्यांना 1 तासांचा वेळ लागला. याकामी त्यांना डॉ.अनिल पवार यांनी सहकार्य केले. यावेळी भुलतज्ञ म्हणून डॉ.सचिन चव्हाण हे होते. गुंतागुतीची सर्वात मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि नारळाच्या आकाराचा मुतखडा पोटातून बाहेर काढण्यात आला. रूग्णास जीवनदान दिल्याबद्दल कुरेशी कुटुंबियांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह सौ.के.एस.के. हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीमचे आभार व्यक्त केले.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद होण्याची शक्यता
नारळाच्या आकाराचा असलेल्या मुतखड्याची लांबी 11 सेमी, रूंदी 6 सेमी तर उंची 7 सेमी आहे. तर वजन एकूण 776 ग्रॅम इतके आहे. या मोठ्या मुतखड्याची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली. त्यांच्या यशस्वी कामगिरीची राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद होण्याची शक्यता आहे.