जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू: बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न.
बीड परतिनिधी.- जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले. या आंदोलनामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले. यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. या दरम्यान दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी ६ च्या दरम्यान अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर आश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक सुरु होती. बैठकीनंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांना लाठीचार्ज चा निषेध नोंदवत आंदोलनाला पाठिंबा देण्याचे निवेदन देण्यात आले.
यादरम्यान मराठा क्रांती मोर्चा बीड च्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील आठरा पगड जाती धर्मातील बांधवांनी बंदला प्रतिसाद देऊन शांततेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.