6 सप्टेंबरला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा
गेवराई प्रतिनिधी : गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा शेतकऱ्यांना पीक विम्याची आगरीम रक्कम द्या यासह विविध मागण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी 6 सप्टेंबर, बुधवार रोजी शेतकरी विराट मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे यातील पीक विम्यातील अग्रीम रक्कम देण्याचे शासनाने मंजूर केले आहे, असे असले तरी इतर मागण्यांसाठी मोर्चा होणारच असा स्पष्ट निर्धार बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.
गेवराई तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात संपूर्ण पावसाळा संपत आला तरी पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक पिकांची पेरणी आणि लागवड होऊ शकलेली नाही. त्यातच ज्या पिकांची लागवड झाली तेही पावसाअभावी करपून गेली आहेत यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात पिक विम्याची अग्रीम रक्कम तात्काळ मंजूर करावी. यासह कांद्यावरील लावलेला निर्यात कर रद्द करावा. शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. यासह विविध मागण्यासाठी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे 6 सप्टेंबर 2023 रोजी गेवराई तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची गावागावात आणि शेतकऱ्यांमध्ये जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केलेली पिक विम्याची अग्रीम रक्कम मंजूर करण्याची मागणी मार्गी लागली असून, जिल्हाधिकारी यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील मंडळासह बीड जिल्ह्यातील सर्व मंडळातील 25 टक्के अग्रीम पिक विमा मंजूर केला असल्याची अधिसूचना काढली आहे. हे बदामराव पंडित यांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. असे असले तरी दिनांक 6 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा विराट मोर्चा हा ताकतीने निघेल आणि जोपर्यंत गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही, त्यासह केलेल्या विविध मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिला आहे.