उद्या सकाळी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या घरी देणार सदिच्छा भेट
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राष्ट्रवादी मधून मोठा गट बाहेर पडल्यानंतर सत्तेमध्ये सहभागी झाला. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, गेवराई मतदार संघातील नेते अमरसिंह पंडित यांनी सुद्धा पवार साहेबांना धोका देत, अजित पवारांना पाठिंबा दिला. यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असून ते उद्या सकाळी गेवराई येथील माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, खऱ्या अर्थाने ही भेट म्हणजे गेवराई मतदार संघामध्ये अमरसिंह पंडित यांना मात देण्यासाठी आखलेली रणनीती समजले जात आहे.
गेवराई मतदार संघाचे नेते अमरसिंह पंडित हे नेहमीच पवार कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. परंतु मध्यंतरी राष्ट्रवादी मधून अजितदादा बाहेर पडल्यानंतर अमरसिंह पंडित यांनी अजित दादांना पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर बीड व गेवराई मतदार संघामध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या, पवार साहेबांच्या निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांनीच पवार साहेबांना धोका दिल्याच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या. बीड जिल्ह्यात उद्या राष्ट्रवादी फुटल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येत आहेत. विशेष म्हणजे सर्वात पहिले ते गेवराई मतदार संघात येत असून गेवराई येथील माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या घरी सकाळी ते सदिच्छा भेट देत आहेत. या भेटी मागची मोठी कारणे असून गेवराई मतदार संघामध्ये अमरसिंह पंडित यांना मात देण्यासाठी खऱ्या अर्थाने आता शरद पवार यांनी रणनीती आखली असून याचा फटका भविष्यामध्ये अमरसिंह पंडित यांना बसण्याची शक्यता आहे.