जिल्ह्यामध्ये वनविभाग फक्त नावालाच
वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात खुलेआम वृक्षतोड
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड जिल्ह्यात पहिलेच वनक्षेत्र कमी आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे अपेक्षीत असते परंतु बीड जिल्ह्यात फक्त 2.40 टक्केच वनक्षेत्र आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये वृक्षलागवड करणे अपेक्षित असताना सुद्धा वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. यासह जिल्ह्यात खुलेआम वृक्षतोड होत असून जिल्ह्यातील वनक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. या सर्व बाबीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी वनविभागाकडे आपला मोर्चा वळवला असून जिल्ह्यातील अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुढाकार घेणार आहेत. तसेच यावर्षी जिल्ह्यामध्ये वृक्षलागवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी प्रारंभशी बोलताना दिली.
बीड जिल्ह्यामध्ये फक्त 2.40 टक्के वनक्षेत्र असल्याने जिल्ह्याला 3-4 वर्षानंतर दुष्काळाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील कमी असलेले वनक्षेत्र वाढवण्यासाठी आजपर्यंत तरी वनविभागाने विशेष असा पुढाकार घेतलेला नाही. जिल्ह्यातील नागरिकांना झाडाचे महत्त्व समजावे यासाठी वनविभागाने जनजागृती मोहिम सुद्धा राबवलेली नाही. वनविभागाच्या उदासिनतेमुळे जिल्हाकरांना प्रत्येक दोन-तीन वर्षाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. झाडे लावणे सोडाच परंतु जी झाडे आहेत त्या झाडांचे रक्षण करणसुद्धा वनविभागाला जमेना. जिल्ह्यामध्ये शंभरच्यावर सॉमिल असून या सॉमिलमध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केलेले लाकड येत आहेत. या सर्व बाबींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मॅडम याकडे विशेष लक्ष देवून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य त्या सूचना कराव्यात.
जिल्ह्यात सुरू असलेल्या सॉमिल कोणाच्या आशीर्वादाने चालतात
बीड जिल्ह्यामध्ये शंभरच्या वर सॉमिल असून या सॉमिल नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड शहरासह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सॉमिल असून या सॉमिलमध्ये बेदायदेशीर वृक्षतोड केलेली लाकडे आहेत.नेमके कोणाच्या आशीर्वादाने ह्या सॉमिल चालतात याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.