जिल्ह्यातील बॉर्डरवर 14 ठिकाणी चेकपोस्ट,
चेकपोस्टवर अधिकाऱ्यांसह सीसीटीव्हीची राहणार नजर
जिल्ह्यातील ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त
सायबर विभागाचे सोशल मिडियावर वॉच
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : ईद व आषाढी एकाच दिवशी येत असल्यामुळे हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये 600 होमगार्ड, 1 एसआरपी तुकडी, 6 ट्रेन फोर्स संबंधित ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांची उत्सवाच्या अनुषंगाने नियुक्त्या केलेल्या आहेत. यासह सोशल मिडियावर सुद्धा जिल्हा पोलीस प्रशासनाची विशेष नजर राहणार असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सायबर विभागाला व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी सोशल मिडियाच्या केसेसवरून अनेक वाद घडलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सतर्क मोडवर आहेत. आषाढीला धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगड येथे मोठ्या संख्येने भाविक भक्त येत दर्शनसाठी येत असतात. या अनुषंगाने सुद्धा नारायणगड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाची असणारी ईद व हिंदु बांधव व वारकऱ्यांसाठी मोठा उत्सव असणारी आषाढी एकादशी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यशासनाने पोलीस विभागाला योग्य त्या सूचना केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सुद्धा हे दोन्ही उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावली आहे. जिल्ह्यातील 14 ठिकाणच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली असून याठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून याठिकाणी हे चेकपोस्ट सुरू करण्यात आली आहे. ईद व आषाढी संपेपर्यंत या चेकपोस्ट सुरूच राहणार आहेत. या सर्व चेकपोस्टवर सीसीटीव्ही सुद्धा बसविण्यात आलेली आहे. याचं सर्व कंट्रोल पोलीस अधीक्षक कार्यालय येथून होत असल्यामुळे कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ या चेकपोस्टवरील पोस्ट त्याठिकाणी वेळेत पोहोचू शकते असे नियोजन बीड जिल्हा पोलीस दलाने केले आहे. तसेच सर्वचजण सोशल मिडियाला वापर करत असून यातील काही जण एखाद्या समाजाच्या भावना दुखवतील अशा पोस्ट करत असल्यामुळे मध्यंतरी काही वाद राज्यात घडलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सायबर विभाग ॲक्शन मोडवर असून आक्षेपार्ह पोस्ट केल्यास पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या हालचाली सुद्धा सुरूच आहेत.
आषाढीनिमित्त नारायणगडवर राहणार विशेष पोलीस बंदोबस्त
आषाढी एकादशीनिमित्त जे भाविक पंढरपूरला जावू शकत नाहीत व जिल्ह्यातील भाविक धाकटी पंढरी म्हणून नारायणगडची मनोभावे पूजा करतात ते भाविक आषाढीला नगदनारायणच्या दर्शनासाठी नारायणगड येत असतात. गेल्यावर्षी आषाढीला नारायणगडवर व परिसरात मोठी वाहातूक कोंडी झाली होती यामुळे लोकप्रतिनिधी, सर्वसामान्यांना, वारकऱ्यांना तासनतास या कोंडीत अडकावे लागले होते. या सर्व बाबीच्या अनुषंगाने पोलीस दलाने यावेळी विशेष खबरदारी घेतली असून आषाढीच्या अनुषंगाने नारायणगडावर विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सायबर विभागाची राहणार विशेष नजर
मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रामध्ये सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यामुळे अनेक दंगली घडलेल्या आहेत. या सर्व बाबीच्या अनुषंगाने बीड जिल्हा सायबर विभागाने विशेष खबरदारी घेत सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. सध्या सायबर विभागाची सोशल मिडियावर विशेष लक्ष आहे.
ईद व आषाढी उत्साहात पण शांततेत साजरी करावी
ईद व आषाढी एकाच दिवशी येत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही उत्सव सर्वांनी शांततेत साजरे करावेत यासह सोशल मिडियावर आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर