जिल्ह्यात होणाऱ्या विद्यार्थी वाहतूकीवर नियंत्रण कोणाचे?
-उद्या पासून शाळा सरु; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय?
-जिल्ह्यात मोजक्यात वाहनांकडे फिटनेस, बाकी वाहनांचे काय?
-जिल्ह्यात नियमांची सर्रास पायमल्ली; आरटीओ व वाहतूक शाखा फक्त नावालाच का?
-परवानगी नसतानाही बीड मध्ये सुसाट धावतात ऑटो रिक्षा
-नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर का होत नाही कारवाई?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शैक्षणिक वर्ष 2023-24 ची सुरुवात उद्या (ता. 15) होत असून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतू दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी जी वाहने ये-जा करण्यासाठी आहेत, यात काही वाहने खासगी स्कूल चालकांची आहेत तर काही खासगी मंडळींची आहेत. यातील अनेक वाहनांकडे फिटनेस परवानाच नाही. यामुळे आपण आपल्या पाल्यांचा जिव तर धोक्यात टाकत नाहीत ना? याचा सुद्धा विचार सर्वच पालकांनी करायला हवा. सध्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 80 ते 90 टक्के वाहनांकडे फिटनेस परवानाच नाही. यासह ज्या वाहनांना विदद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगीच नाही अशी वाहने सुसाट धावतात. नियमांची पायमल्ली होत असताना सुद्धा या सर्व वाहनांकडे आरटीओ विभाग व वाहतूक पोलीस का दुर्लक्ष करत आहेत? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना नक्कीच रोखता येथील. यासाठी आरटीओ विभाग व वाहतूक शाखेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून स्कूल चालक व इतर मंडळी नियमाबाह्य वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. नियमाप्रमाणे सर्वच स्कूल चालकांनी जी वाहने विद्यार्थ्यांसाठी नेमलेली आहेत. ती सर्व वाहने आरटीओ नियमाप्रमाणे तयार ठेवण्याची गरज असते. परंतू अनेक वाहनांकडे फिटनेस परवानाच नसतो. ज्या वाहनांकडे फिटनेस परवाना नाही असा वाहनात विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात कोण टाकत आहे? ज्या वाहनांकडे फिटनेस नाही अशा वाहनांवर आरटीओ विभाग व वाहतूक पोलीस कारवाई का करत नाहीत. वेळीच जर अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली तर भविष्यात होणाऱ्या दुर्घटना घडणार नाहीत. यामुळे बीड जिल्ह्यात फिटनेस नसलेल्या वाहनांवर आरटीओ विभाग व वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
काय आहे धोरण
वाहनाच्या फिटनेसबाबत आरटीओ कार्यालयामध्ये नोंद करावी, सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक वाहनात प्रथमोचार साहित्य ठेवावे, प्रत्येक वाहनात महिला अथवा पुरुष सहकारी ठेवावे, शाळेत समिती गठित करावी, आरटीओने जितके प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे तेवढ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर तेवढ्या खासगी वाहनांची व्यवस्था करावी, वाहनात आपत्कालीन खिडकी असणे गरजेचे असते. परंतू वरील नियमांचे आपल्याकडे पालन होताना दिसत नाही.
विना परवाना धावणाऱ्या ऑटोंवर कारवाई होणार का?
मुळात विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी नियमाप्रमाणे स्कूल व्हॅन असणे गरजेचे असते. परंतू आपल्या अनेक भागात स्कूल व्हॅन जात नसल्यामुळे बीड शहरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षांमध्ये मुलांना पालक पाठवतात. परंतू ह्या ऑटो रिक्षांना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी नसते. तरीही ही रिक्षा शहरात सुसाट धावत आहेत. यात गंभीर बाब म्हणजे हे ऑटो चालक एका रिक्षा मध्ये जनावरे कोंबल्या सारखे विद्यार्थ्यांना कोंबतात. यामुळे आपणच आपल्या पाल्यांचा जीव तर धोक्यात टाकत नाहीत ना? याचा सुद्धा विचार पालकांनी करण्याची गरज आहे. यासह संबंधित विभागाने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षा बैठक प्रत्येक शाळांमध्ये घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कसूर करणाऱ्या स्कुल बसेसवर निश्चितच कारवाई केली जाईल.नागरिकांनी वा पालकांनी स्कुल बसेस संदर्भात काही अडचणी असेल तर आरटीओ कार्यालयात तक्रार द्यावी.गणेश विघ्ने, मोटार वाहन निरीक्षक बीड.
ज्या वाहनांकडे फिटनेस परवाना नसेल त्या वाहनांवर आम्ही कारवाई करणार आहोत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी नियमानुसार वाहतूक करावी, नसता या वाहनांवर आम्ही कारवाई करुत. यासह लवकरच शहरातील जी वाहने नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई मोहीम हाती घेणार आहोत. रविंद्र पेरगूलवार, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा, बीड.