–महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा
–धनंजय मुंडे, प्रकाश सोळूंके यांची मोर्चाला दांडी
–अमरसिंह पंडीत, संदिप क्षीरसागर, राजेश्वर चव्हाण, अनिल जगताप, सुनिल धांडे यांच्यासह इतर नेत्यांची प्रमुख उपस्थिती
–आज आम्ही कार्यकर्त्यांना शांत केलंय – आ. संदिप क्षीरसागर
–अनिल जगताप यांनी दिले धमक्या देणाऱ्यांना ओपन चॅलेंज
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे संजय राऊत या दोघांनाही धमकी दिल्याप्रकरणी आता महाविकास आघाडी आक्रमक झाली असून आज बीड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मकमोर्चात महाविकास आघाडीतील प्रमुख नेते व समविचारी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. परंतु यामध्ये जिल्ह्यातील दोन नेते म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे व आ.प्रकाश सोळंके हे अनुपस्थित राहिल्यामुळे मात्र चर्चेला उधान आले. याच अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित म्हणाले की, धनंजय मुंडे व प्रकाश सोळंके या दोघांचीही तब्येत बरोबर नसल्यामुळे ते या मोर्चाला उपस्थित राहू शकले नाही. यावेळी बोलताना बीड मतदारसंघाचे आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, यावेळेस तर आम्ही कार्यकर्त्यांना शांत केलं परंतु पुढच्यावेळेस कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी धमकी देणाऱ्यांना ओपन चॅलेंज करत तुम्ही ठिकाण सांगा आम्ही त्याठिकाणी येतो अशा शब्दात फटकारलं आहे. या मूकमोर्चाला जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे संजय राऊत यांना तुमचाही दाभोळकर करू अशी धमकी देण्यात आल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. बीडमध्ये सुद्धा आज महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ.विक्रम काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.पृथ्वीराज साठे, सुशिलाताई मोराळे, राजकिशोर मोदी, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, नितीन धांडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने मूकमोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना देण्यात आले. मूकमोर्चात सहभागी झालेल्या सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. यावेळी पत्रकारांशी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, धमकी देणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरले तर अनुचित प्रकार घडला तर यास सर्वस्वी जबाबदार शासन असेल. त्यामुळे लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणीही महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन गेल्यानंतर या परिसरातून जिल्हाधिकारी यांची गाडी आल्यानंतर आ.संदीप क्षीरसागर यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाजूला करत जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला.