बीड प्रतिनिधी – सुमंत रूईकर हे कडवट शिवसैनिक होते. शिवसेनाप्रमुखांना दैवत समजत होते. त्यांच्या मृत्युनंतर विरोधक आणि त्यांचे कुटुंब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत असतील तर या वेदना सुमंत रूईकर यांनाही झाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येक शिवसैनिकांनी आपली ऐपत नसताना सुमंत रूईकरांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दूरध्वनीवरून त्यांच्या कुटुंबाची चौकशी केली. शिवसेना नेत्यांनी रूईकर कुटुंबियांना आर्थिक मदतीचा आधार दिला. तरीही जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी आरोप करत असतील तर हे दुर्देव आहे. या राजकारणात रूईकर कुटुंबियांना पडू नये अशी मी त्यांना विनंती करतो. यापुढेही आम्ही शिवसैनिक रूईकर कुटुंबियाच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचे जिल्हप्रमुख अनिल जगताप यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी सुमंत रूईकर यांच्या पत्नीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष न दिल्याचे आरोप केले. ते धांदाल खोटे आहेत. सुमंत रूईकर हे दोनवेळा तिरूपतीला पायी गेले. पहिल्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पायी गेले होते. ते जेव्हा परत आले तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. यापुढे असे नवस करू नका असेही म्हटले होते. दुसर्या वेळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिर्घायुष्यासाठी सुमंत रूईकर बीडहून तिरूपतीला पायी जात असताना प्रवासात ते आजारी पडले. त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा मला फोन करून सुमंत रूईकर यांना शोधा असे आदेश दिले होते. शोधण्यासाठी हेलिकॅप्टरची आवश्यकता भासली तरी चालेल पण तातडीने त्यांना शोधा तसेच शिवसेना नेते अनिल देसाई हे ही आमच्या संपर्कात होते. आम्ही दिवस आणि रात्र संपर्क साधत सुमंत रूईकर यांचा शोध घेत होतो. अखेर त्यांना शोध लागला. तेथील शिवसैनिकांनीच सुमंत रूईकर यांना दवाखाण्यामध्ये उपचारासाठी नेले. रूईकर यांच्या मृत्युनंतर पुढील सर्व क्रिया एक शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वांनी खांद्यावर पेलली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तातडीने बीडमध्ये येवून त्यांच्या कुटुंबियांना साडेपाच लाख रूपयाची मदत दिली. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेनेच्या पदाधिकार्यांना मुंबईवरून बीडमध्ये येत मोठ्या आर्थिक मदतीचा आधार दिला. एवढेच काय आम्ही सर्व पदाधिकारी आणि बीड जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे एका शिवसैनिकाच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले होते. अनेकांनी त्यांना रोख रक्कम दिली तर त्यांच्या बँकेच्या अकाऊंटवरही अनेकांनी रक्कम जमा केली. सुमंत रूईकर यांच्या मृत्युप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते. रूग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी सुमंत रूईकरांच्या मृत्युविषयी हळहळ व्यक्त केली. असे असताना रूईकर कुटुंब मात्र आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. हे आरोप सुमंत रूईकर यांनाही कधी मान्य झाले नसते. सुमंत रूईकर आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले, नगरसेवक झाले असे असतानाही आम्ही शिवसैनिकांनी त्यांना कधी अंतर दिले नाही. असे आरोप करून सुद्धा आज आणि यापुढेही आम्ही सर्व शिवसैनिक सुमंत रूईकर कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूत, एक भाऊ म्हणून मी रूईकरताईंच्या पाठिशी उभा असल्याचे म्हणत गलिच्छ राजकारणात रूईकर कुटुंबियाने पडू नये अशी विनंती केली.