बीड प्रतिनिधी : तत्कालीन चौसाळा मतदार संघाचे आमदार स्व. चांदमलजी लोढा यांचे सुपूत्र व उद्योग जगतातील प्रसिद्ध उद्योजक दिलीप शेठ लोढा यांनी काल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खा.डॉ. प्रितमताई मुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवादी विचारधारेतून होत असलेला लोकहिताचा देशाचा कारभार उल्लेखनीय आहे. सर्व स्तरातील घटकांपर्यंत विकासाची पोहचलेली गंगा यामुळे सामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. जगभरात भारत देशाची प्रतिष्ठा निर्माण झाली. उद्योग व्यवसाय व्यापार औद्योगिक क्रांती यामध्ये अमुलाग्र बदल झाला. मागील पन्नास वर्षातील देशात बरबटलेला कारभार यामध्ये भाजपा सरकारने केलेले परिवर्तन देश हिताचे ठरले आहे. शिवाय लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेले विकासाचे राजकारण, त्याच वाटेवर लोकनेत्या पंकजाताई यांचे कर्तुत्व यामुळे आपण आकर्षित झालो असून, समर्पित भावनेने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे दिलीप लोढा यांनी सांगितले.
जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी त्यांचा प्रवेश झाला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदडा, अशोक लोढा, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, प्रा.देविदास नागरगोजे, सलीम जहागीर, उषाताई मुंडे, भारत काळे, विजयकांत मुंडे आदि उपस्थित होते.
स्वर्गीय चांदमल लोढा परिवाराने कायम प्रस्तापितांच्या विरोधात लढा देऊन सामान्य जणांसाठी राजकारण केले. सभापती पदापासून ते आमदारकी पर्यंतचा त्यांचा प्रवास सामान्य लोकांसाठी होता. लोकांच्या पाठींब्यावर आणि स्वत: धमक दाखवून क्षीरसागराचा पराभव करणारा धाडसी व निर्भीड व्यक्ती म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची नोंद आहे. त्यांचा स्वाभिमानाचा वसा आणि संस्काराचे आचरण करणारे त्यांचे सुपुत्र दिलीप लोढा यांची उद्योग क्षेत्रातील लोकांशी नाळ जोडलेली आहे. व्यापारी वर्गात त्यांचे मोठ्या प्रमाणावर हितचिंतक असून, त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार जोडलेला आहे. त्यांचे प्रवेश प्रसंगी अनेक व्यापारी आवर्जून उपस्थित होते. भाजप प्रवेशामुळे बीड शहरात भारतीय जनता पार्टीची ताकत वाढली आहे. व्यापक दृष्टीकोन असलेला उद्योजक भाजपात आल्याने भविष्यात उद्योग आघाडीची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळेल अशी चर्चा आहे.