बीड : शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिम प्रसंगी सकाळपासून उपस्थित राहत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज मोहिम पूर्ण करण्यासाठी वाढत्या सहभागा बद्दल आनंद व्यक्त केला. तसेच शहरातील नदीचे पूर्ण पात्र स्वच्छ करेपर्यंत मोहीम सुरू राहणार असून बीड शहरातून जाणाऱ्या सहा किलोमीटर लांबीच्या नदी प्रवाह पैकी साडेतीन किलोमीटर लांबीचा भाग अति प्रदूषित झाला आहे.मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक नागरिक व स्वयंसेवी संस्थानी मोहिमेत देखील सहभागी व्हावे , असे आवाहन देखील केले.
आज तिसऱ्यांदा शनिवारी ही मोहीम सलग तिसऱ्यांदा सकाळी साडेसात पासून राबविण्यास सुरुवात करण्यात आली.यावेळी अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते उपस्थित होते. नदीच्या स्वच्छतेसाठी आज कंकालेश्वर चौक, मोमीनपुरा कडे जाणारा रोड वरील पुल आणि जुना मोंढा पुल परिसरातील नदीच्या पात्रातील कचरा, झुडपे काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी 20 ट्रॅक्टर चार जेसीबी एक पोकलेन एक हायवा 200 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. बीड नगरपालिका प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेतून सदर मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ७ जानेवारी व 14 जानेवारी रोजी सलग दोनदा ही मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत यापूर्वी सोमेश्वर मंदिर पुलाजवळील भाग व दगडी पुलाजवळील बराचसा भाग स्वच्छ करण्यात आला आहे.
मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मार्फत जुना मोंढा पूल परिसरातील नदीच्या पात्रातील स्वच्छता करण्यासाठी सहभाग घेतला. याची पाहणी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी केलेी. यावेळी उपअभियंता श्री बोराडे, कनिष्ठ अभियंता श्री आगवणे उपस्थित होते. लोकसहभागाबरोबरच शासकीय निधीची तरतूद देखील यासाठी केली जात आहे. त्यासह नागरिक देखील योजनेसाठी निधी देऊन सहभागी होऊ शकतात. स्वतंत्र बँक अकाउंट निर्माण करण्यात आले आहे व खात्याचे नंबर सगळ्यांसाठी घोषित करण्यात आले आहेत .
याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे तेव्हाच कचरा टाकण्याची सवय दूर होऊ शकते. नदीची कचरा व प्रदूषणातून मुक्तता होऊ शकते. स्वच्छता मोहीम नंतर भविष्यात नदीच्या काठावर सुंदर विकसित जॉगिंग ट्रॅक, फूटपाथ आदी सुविधा निर्माण करता येऊ शकतात असे त्यांनी सांगितले.