पोलीस कर्मचार्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातच सात दिवसांची विशेष ट्रेनिंग
या कोर्सचा 2300 पोलीस कर्मचार्यांना होणार फायदा
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : पोलीस विभाग म्हटलं की पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष देता येत नाही, म्हणून पोलीस बांधवांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील 2300 कर्मचार्यांना सात दिवसांचा उजळणी कोर्स ठेवण्यात आला आहे. याची सुरुवात नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2023 पासून झाली आहे. पहिली बॅच 30 कर्मचार्यांची असून हा कोर्स जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू आहे. या कोर्समध्ये पोलीस कर्मचार्यांनी आर्थिक नियोजन कसे करावे, स्वत:च्या शरीराची काळजी कशी घ्यावी, तणावमुक्त व आनंदी कसे रहावे, सायबर यासह कायद्याच व सायबर विभागाचे ज्ञान देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील 2300 कर्मचार्यांना विशेष मदत व्हावी या सकारात्मक भावनेतून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या संकल्पनेतून उजळणी कोर्स 1 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आला. या कोर्समध्ये प्रत्येक ठाण्यातील एक कर्मचारी सात दिवसांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार आहे. या सात दिवसांमध्ये त्या कर्मचार्यासाठी राहण्याची-जेवणाची सोय करण्यात आली आहे. या सात दिवसांत या कर्मचार्यांना सकाळी मेडिटेशन, योगा, ध्यान, व्यायाम याची माहिती तज्ज्ञ डॉक्टर देणार असून त्यांच्याकडून ते सर्व घेणार आहेत. यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना दिवसभरात विविध माहिती देण्यासाठी तज्ज्ञ लोक उपस्थित राहणार असून त्यांना या सात दिवसामध्ये मोठी माहिती मिळणार असून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामामध्ये याचा वापर केल्यास त्यांना नक्कीच भविष्यात याचा फायदा होवू शकतो. एक बॅच सात दिवसांची असून या बॅचमध्ये 30 कर्मचारी असणार आहेत. जोपर्यंत संपूर्ण कर्मचार्यांना हा उजळणी कोर्स दिला जात नाही तोपर्यंत हा कोर्स सुरूच राहणार आहे.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 2300
कर्मचार्यांसाठी उजळणी कोर्स सुरु करण्यात आला आहे. या कोर्सचा हेतू
एवढाच आहे की, आमच्या कर्मचार्यांनी तणावमुक्त व आनंदी जिवन जगावे. धावपळीच्या
कामकाजामुळे आमच्या कर्मचार्यांना शरीराकडे म्हणावे अशी काळजी घेता येत
नाही यामुळे या शिबिरात त्यांचे आरोग्य व आर्थिक नियोजनाबद्दल विशेष लक्ष
देण्यात येणार आहे
अप्पर पोलीस अधीक्षक, सचिन पांडकर, बीड