जिल्ह्यातील 185 गावे अतिसंवेदनशील, पोलीस अधीक्षकांची राहणार विशेष नजर
निवडणूकीत गुन्हे नोंद असणाऱ्यांवर होणार कारवाई
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 704 ग्रामपंचायतच्या निवडणूका होणार असून याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील 185 अतिसंवेदनशील गावात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यासह निवडणूकीच्या काळात गुन्हे नोंद असणाऱ्यांवर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित ठाणेप्रमुखांना देण्यात आल्याचे सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यामध्ये निवडणूकीच्या काळात अनेकवेळा बुथ ताब्यात घेण्यात आल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. पूर्वीची पार्श्वभूमी पाहता जिल्ह्यात 185 गावे अतिसंवेदनशील आहेत. या 185 गावात पूर्वी बुथ ताब्यात घेण्याचे प्रकार घडलेले आहेत, वाद झालेले आहेत. यामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत पुन्हा गोंधळ होवू नये यासाठी पोलीस प्रशासन विशेष काळजी घेत आहे. ग्रामपंचायत निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी सर्व ठाणेप्रमुखांना योग्य त्या सूचना केल्या असून ते सुद्धा वेळोवेळी या प्रक्रियेवर अपडेट माहिती घेवून योग्य त्या खबरदारी घेत आहेत.