शिंदे गट व भाजपा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आण्णांच्या प्रवेशास विरोध
–शिवसेनेतून काढल्यानंतर सुद्धा आण्णांचे मौन कायमच
–आण्णांच्या मौन भुमिकेमुळे मात्र कार्यकर्ते अस्थिर
प्रारंभ वृत्तेसवा
बीड : बीड विधानसभा मतदार संघात ज्यांची मजबूत पकड होती, ज्यांच्याकडे राष्ट्रवादीत पक्षात नेहमीच मोठी जबाबदारी असायची असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गेल्या काही वर्षापासून विविध समस्यातून जात आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्यावर शिवसेनेने कारवाई करत त्यांना पक्षातून काढले. एवढ्या सर्व घडामोडी घडत असताना सुद्धा जयदत्त क्षीरसागर हे मात्र शांतच असल्याचे दिसत आहे. त्यांना शिंदे गट व भाजपामध्ये जाण्यास येथील त्या त्या पक्षातील पदाधिकारी विरोध करत असल्यामुळे त्यांचा प्रवेश नाकारला जात आहे. यामुळे सध्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कोणत्याच पक्षाचा झेंडा मिळत नसल्याची परस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी राज्यात मोठ्या पदावर काम केलेल्या नेतृत्वास आज कोणताच पक्ष प्रवेश देत नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पक्षातून काढण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती. यानंतर आण्णा शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा जोमात सुरु होती. तसेच भाजपा मध्ये आण्णांचा प्रवेश निश्चित झाल्याचे सुद्धा बोलले जात होते. परंतू शिंदे गट व भाजपा मध्ये त्यांना त्या त्या पक्षातील येथील पदाधिकारी विरोध करताना दिसत आहेत. यामुळे शिंदे गट व भाजपा पक्षातील वरिष्ठ नेते स्थानिक पदाधिकारी म्हणतील तसे वागत आहेत. यामुळे निश्चित झालेला आण्णांचा प्रवेश मात्र लांबणीवर पडला आहे. डिसेंबर मध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मात्र याचा मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र सध्या बीड विधानसभा मतदार संघात निर्माण झाले आहे. यासह पुढच्या वर्षी होणाऱ्या नगर पालिकेत सुद्धा यांचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या सर्व विरोध व इतर घडामोडी घडत असताना सुद्धा आण्णा मौन सोडायला तयार नाहीत. सध्या आण्णांना कोणत्याच पक्षाचा झेंडा मिळत नसल्याचे चित्र असले तरी दुसरीकडे मात्र कार्यकर्ते अस्थिर झाल्याचे दिसत आहे. भाविष्यातील राजकारण लक्षात घेता आण्णांनी वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा अशी चर्चा सुद्धा कार्यकर्ते दबक्या आवाज करत आहेत.