नवीन सबस्टेशनची कामे पूर्ण करणे, रिक्त पदांची भरती आदी विषयांवरही सकारात्मक चर्चा
परळी : यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला असला तरी वीज वितरण व्यवस्थेमध्ये मात्र असंख्य त्रुटी दिसून येत आहेत. शेतकऱ्यांचे अनेक विजजोडणीचे अर्ज प्रलंबित असून पावसाळा संपण्यापूर्वी शेती पंपांना वीज जोडणीचे सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीस मुख्य अभियंता श्री. लटपटे, अधीक्षक अभियंता श्री. निकम, कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे, उपकार्यकारी अभियंता श्री. अंबाडकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, युवक नेते अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, लक्ष्मण तात्या पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपक नाना देशमुख, माणिकभाऊ फड, नितीन कुलकर्णी, अनिल अष्टेकर, जयराज देशमुख यांसह आदी उपस्थित होते.
परळी मतदारसंघात विविध गावांमधील ट्रान्सफॉर्मर्स लोडमुळे अपग्रेड करणे अपेक्षित आहे, त्या सर्वांची यादीच मुंडेंनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. यामध्ये ट्रान्सफॉर्मर्सची क्षमता वाढविण्याचे सर्वच कामे अति आवश्यक असून, ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आ. मुंडेंनी केल्या; ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील, असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री. लटपटे यांनी दिले.
याशिवाय जुन्या सबस्टेशन वरील पडणारा अधिकचा ताण कमी व्हावा यासाठी मतदारसंघात मंजूर करून सुरू करण्यात आलेली सबस्टेशनची कामे जलद गतीने पूर्ण केली जावीत, त्याचबरोबर मतदारसंघात रिक्त असलेली पदे तातडीने भरली जावीत, अशीही सूचना मुंडेंनी केली.
संपूर्ण परळी मतदारसंघात वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करण्यासह विविध योजनेतील बरीच कामे होणे अपेक्षित आहे; मात्र जिल्हा नियोजन समितीचा निधी थांबवल्याने व ऊर्जा विभागाचा कारभार सत्तांतर झाल्यानंतर थंड झाल्याने सध्या निधी उपलब्ध होण्यास अडचण होत असल्याचे स्पष्ट आहे. यावरून ऊर्जा विभागाचे मंत्री व मुख्य सचिव यांची लवकरच भेट घेणार असल्याचे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.