बीडकरांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी
बीड प्रतिनिधी : शहरात चालण्यासाठी धड रस्ते नाहीत. घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी काही भागात अजूनही नाल्या नाहीत. पाणी असूनही नळाला पंधरा – पंधरा दिवस पाणी सोडले जात नाहीत. जागोजाग कचरा कुंड्या नाहीत. प्रत्येक ठिकाणी नुसते कचऱ्याचे ढीग आहेत. काही भागात नुसता चिखल आणि चिखलच झालेला आहे तरीही दोन्ही क्षीरसागर म्हणतात आम्ही विकास केला. विकास काय असतो हे आता शोधण्याची वेळ बीडच्या जनतेवर आली आहे आणि याला क्षीरसागर हेच जबाबदार आहेत. विकास केला असता तर त्यांना आज मत मागण्यासाठी दारोदार फिरण्याची गरज नव्हती. उठसुठ विकासाची वाजंत्री वाजविणाऱ्या दोन्ही क्षीरसागरांनी एकदा शहरात पायी फिरूनच दाखवावे असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.
बीड शहरात गेल्या पाच वर्षात काहीच झाले नाही. विकासाचा नारा देणाऱ्या क्षीरसागरांनी अक्षरशः वाट लावून टाकली आहे. शहरातील नागरिकांना क्षीरसागरांच्या सत्तेचा वीट आला आहे. मोजक्याच ठिकाणी रस्ता आणि नाल्यांची कामे झाली आहे. इतर ठिकाणी मात्र रस्त्यांचे प्रचंड हाल आहेत. मोठ मोठ्या खड्ड्यामुळे अनेकांना पाठीचा आजार जडला आहे. योग्य नियोजन नसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. एक पाऊस पडला तरी अख्खे शहर जलमय होते. जागोजाग पाण्याची डोह साचतात. आधीच नालीतील पाण्याची घाण रस्त्यावर येत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने रोगराई पसरू लागली आहे. धुळीने जनता त्रस्त झाली असून माजलगाव प्रकल्प आणि बिंदुसरा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असतानाही शहरात 15 – 15 दिवस नळाला पाणी येत नाही. नागरिकांना या गोष्टींचा प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे आता बीड नगरपालिकेत कोणतेच क्षीरसागर नको अशी भूमिका नागरिकांची आहे. विकास कामे केली असती आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या असत्या तर आज त्यांना मत मागण्यासाठी दारोदार फिरण्याची गरज पडली नसती. क्षीरसागर मुक्त बीड शहराच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.