Beed : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, जिल्ह्यातील 75 शाळा, महाविद्यालयांमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, पिंक मोबाईल व सायबर सेल हे भेटी देऊन त्यांना महिला व बालकांविषयीचे गुन्हे, सायबर क्राईम, आझादी का अमृतमहोत्सव या बाबत माहिती देऊन 26 जुलैपासून जनजागृती करण्यात येत आहे. हा उपक्रम 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
श्री. ठाकूर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बीड येथून दि. 27 जुलैला अमृतमहोत्सव दौडची सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये 14 ऑगस्टपर्यंत दररोज दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 75 किलोमीटर दौड पूर्ण करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी 10 कि. मी. दौड घेऊन या दौडची सांगता होणार आहे. त्या दिवशी पुरूष व महिला गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना पदक व बक्षीस देण्यात येणार आहे.
श्री. ठाकूर म्हणाले, बीड शहरातील मुख्य चौकामध्ये दि. 4 ऑगस्टपासून पोलीस बँडमार्फत देशभक्तीपर गीत धून वाजवून जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय दि. 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालय, बीड येथे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन, श्वान पथक, बाँब शोधक पथक यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. किमान 75 महाविद्यालयांमध्ये असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
घरोघरी तिरंगा मोहिमेंतर्गत सर्व पोलीस कार्यालये, निवासस्थान, खाजगी निवासस्थान येथे राष्ट्रध्वज उभारणीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच, सर्व शाळा, महाविद्यालये व शहरातील गर्दीची ठिकाणे राष्ट्रध्वज उभारण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.