बीड : भारतभूषण साहेब तीस वर्ष नगराध्यक्ष राहून आपण महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलमाप्रमाणे नागरिकांच्या मूलभूत सुविधा अथवा नगरपरिषद अधिनियमानुसार कामकाज चालवले आहे का ? चालवले असल्यास आमचे खालील प्रश्नांची उत्तरे द्याच…
सन 1989 मध्ये निकृष्ट दर्जाच्या ब्लिचिंग पावडर व तुरटीच्या वापरामुळे व दूषित पाण्यामुळे बीड शहरातील जवळपास 56 लोक काविळ सारख्या साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडले होते हे खरे आहे काय? असेल तर याला जबाबदार कोण ?
माजलगाव व पालीचे तलाव तुडुंब भरलेले असतांना गेल्या दोन वर्षापासून बीडच्या जनतेला पंधरा -पंधरा दिवसाला दूषित पाणी का देत आहात ? कलम 58 प्रमाणे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे नगराध्यक्षांचे कर्तव्य नाही काय ? नसेल तर आपल्याला पदावर राहण्याचा काय अधिकार होता ?
शहराची हद्द वाढीच्या दृष्टीने कलम 49, 50 प्रमाणे आपण आऊट कट क्षेत्रांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त पाईपलाईन केली का ?
कलम 200 ते 211 पर्यंत नाल्या व मोऱ्याच्या कामावर गेल्या तीस वर्षात आपले नियंत्रण होते का ? का नगरसेवकाचे ? का अधिकाऱ्यांचे ?
पुतण्या उपनगराध्यक्ष व स्वच्छता सभापती असताना बीड शहरात घाणीचे साम्राज्य कोणी केले ? काकाने का पुतण्याने ? या घाणिच्या साम्राज्याचा कायद्यान्वये जबाबदार कोण ?
कलम 266 प्रमाणे खाटकांचे कत्तलखाने तयार करणे व सुस्थितीत ठेवणे हे नगरपरिषदचे कर्तव्य आहे किंवा नाही ? मोमीनपुर्याचा मिनी कत्तलखाना कोणी उध्वस्त केला ? पोलिसांमार्फत खाटीक समाजावर कोणी लाठीचार्ज केला होता ?
कत्तलखाना बांधण्यासाठी केंद्र सरकारने दोन कोटी, छप्पन लाख रुपयांचा निधी बीड नगरपरिषदेला दिला होता किंवा नाही ? त्या निधीतून कत्तलखाना का बांधला गेला नाही ?
कत्तल खाण्यासाठी शहराबाहेर वायबटवाडी येथे नगरपरिषदेने चार एकर जमीन घेतली होती . त्यावर गेल्या दहा वर्षापासून आज पर्यंत कत्तलखाना का बांधला नाही ? खाटीक समाजाला केवळ मतदानासाठी वापरायचे का ? सुविधा देणे हे कोणाचे कर्तव्य आहे ?
नगरपरिषद आणि अधिनियम कलम 91 प्रमाणे वेतन राखीव निधी , सॅलरीरिझर्व फंड मध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध आहे का ? या वर्षात कधी उपलब्ध होईल का ?
नगरपरिषद अधिनियम 1965 प्रमाणे शहराचा कचरा साचून घनकचऱ्यासाठी नगरपालिकाचे टीचिंग ग्राउंड आहे काय ?
घनकचरा प्रकल्पासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये आले होते . ते घनकचऱ्याचे प्रकल्प कोठे आहेत ? तेवढे ते बीडकरांना सांगा ?
ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी आठावण्ण लाखाचे वीज प्रकल्प कुठे आहेत ?
उच्च न्यायालय व शासनाच्या आदेशाप्रमाणे व कायद्यान्वये शहराच्या बाहेर कत्तलखाना बांधताना नगरपालिकेचे कर्तव्य आहे . तो कत्तलखाना कुठे आहे ? तेवढा दाखवा ?
कलम 266 व 270 प्रमाणे मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे बांधणे कायद्याने बंधनकारक असताना आपण तीस वर्षात कोंडवाडे बांधले का नाहीत ? बांधली असल्यास ते कोठे आहेत हे बीडच्या जनतेला दाखवावे ?
कलम 283 ते 290 पर्यंतचे कलमानुसार मोकाट जनावरांवर आपण नियंत्रण ठेवून कर्तव्य पार पाडले आहे काय ?
कलम 293 प्रमाणे गेल्या दहा वर्षात मोकाट कुत्र्याला सुधारित नियमाप्रमाणे कुत्र्यांचा बंदोबस्त केला आहे काय ? नागरिकांना अशा कुत्र्या पासून त्रास आहे किंवा नाही ते आपण सांगावे ?
कलम 294 ते 295 नुसार डुकरे पाळण्यावर आपण नियंत्रण ठेवले आहे काय ?
नगरपरिषद पाईपलाईनचे 20 कोटी रुपयांचे टेंडर ई टेंडर असताना नियम पायदळी तुडवून त्याचे नियम आठ तुकडे पाडून 54 % जास्त दराने टेंडर नगर परिषदला आपण दिले का नाही ?
चार कोटी रुपयाचे मुस्लिम मुलींचे वस्तीग्रह आ.विनायक मेटे साहेबांनी मंजूर करून आणले होते परंतु नगरपालिकेने जागा उपलब्ध न केल्याने ते परत गेले.हे खरे आहे काय ?असल्यास जबाबदार कोण ?
गेल्या दहा वर्षाच्या विकासाच्या गप्पा एकूण कान सुन्न झाले आहेत. आता बीडचे नागरिक तीस वर्षाच्या कामाचा हिशोब मागत आहेत .कारण की गेल्या दहा वर्षापासून तुम्ही काका-पुतण्याच्या राजकीय वादात शहराची , रस्त्याची व नाल्याची दुर्दशा तसेच घाणीचे साम्राज्य उभे केले . पिण्याच्या पाण्याची शहरवासीयांना भटकंती करायला लावली आहे . तलावात पाणी असूनही नियमित पाणी मिळत नाही . नागरिकांना या मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत म्हणून हे कायदेशीर प्रश्नावली डॉ .भारतभूषण क्षीरसागर यांच्या समोर जागृत नागरिक म्हणून नैतिकतेच्या आधारावर ठेवीत आहोत . असे प्रसिद्धी पत्रकात शिवसंग्रामचे शहराध्यक्ष अँड. राहुल मस्के यांनी नमुद केले आहे .