सत्तेत नसल्यामुळे आमदाराच्या तक्रारीची दखल जिल्हाप्रशासन घेत नाही का?
गंगावाडी येथील वाळूचे टेंडर तात्काळ रद्द करा – ग्रामस्थ
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेवराई तालुक्यातील गंगावाडी परिसरातील नियमाबाह्य वाळूचे टेंडर रद्द करण्यात यावे, यासाठी आज (ता. 04) येथील गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरुन आंदोलन सुरु केले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात गेवराई मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून आमदार लक्ष्मण पवार हे गेवराई तालुक्यातील वाळूच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हाप्रशासनाला सुचना करत आहेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. तरीही त्यांच्याकडे जिल्हाप्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. सत्तेतील आमदार नसल्यामुळे त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होतेय का? अशा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. या प्रश्नी आता विभागीय आयुक्त सुनिल केेंद्रेकर यांनीच लक्ष द्यावे अशी मागणी आता येथील नागरीक करत आहेत.
गेवराई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून नियमांची पायमल्ली करत, वाळूमाफिया त्यांची मनमानी करताना दिसत आहेत. गेवराई तालुक्यात जिल्हाप्रशासनाच्या वतिने काही वाळूचे टेंडर सुरु करण्यात आलेले आहेत. यावेळी काही नियम सुद्धा जिल्हा प्रशासनाने तयार करुन संबंधित विभागाला याची अमलबजावणी करण्याच्या सुचना केलेल्या आहेत. परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसून संबंधित टेंडर चालक व वाळू माफिया त्यांची मनमानी करत आहेत. याच अनुषंगाने आमदार लक्ष्मण पवार यांनी गेल्या काही दिवसापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला योग्य त्या सुचना केल्या होत्या. परंतु त्यांची अमलबजावणी आज पर्यंत करण्यात आलेली नाही. यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट दिसत आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील सुरु करण्यात आलेले वाळूचे टेंडर नियमाबाह्य असल्याचे सांगत आज (ता. 04) येथील गावकऱ्यांनी चक्क नदीपात्रात उतरुन आंदोलन सुरु केले आहे. याच आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी सुद्धा नदीपात्रा उतरुन आंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत येथील नियमाबाह्य टेंडर रद्द करण्यात येणार नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा येथील गावकऱ्यांनी दिला आहे. यासर्व बाबींकडे आता विभागीय आयुक्त सुनिल केेंद्रेकर यांची विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.
जिल्हाप्रशासन दुजाभाव करतेय?
गेवराई मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी यथील आमदार विशेष प्रयत्न करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्हा प्रशासन त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. सत्तेतील आमदार यांना एक न्याय व सत्तेत नसणाऱ्या आमदाराला एक न्याय असे काहीसे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. वारंवार आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा प्रशासन सत्तेत नसलेल्या आमदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.