नगर पालिकेने शहरात कुठे झाडे लावली व किती जगवली?प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील नागरीकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी नगर पालिकेची स्थापना करण्यात आलेली आहेत. बीड येथील नगर पालिकेवर गेल्या 30 वर्षापासून डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांची एकहाती सत्ता आहे. परंतु त्यांच्या काळात शहरकरांना मुलभूत प्रश्नांसाठीच मोठा संघर्ष करावा लागत आहे. नगर पालिका नागरीकांकडून विविध टॅक्स घेत असते, यातुनच शहकरांना नगर पालिका सुविधा देते. यात शिक्षण, आरोग्य व शहरात झाडे लावण्यासाठी बीड नगर पालिका टॅक्स घेते. परंतु या टॅक्सचा पैसा नेमका जातो कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. बीड शहरात नगर पालिकेची एकही शाळा नाही, दोन आरोग्य केंद्र आहेत तेही फक्त नावालाच तसेच शहरातील विविध ठिकाणी झाडे लावणे अपेक्षित असताना शहरात झाडांचे प्रमाण कमीच आहे. मग वरील नावावर घेतलेला टॅक्सचा पैसा नेमका कुठे गेला हा प्रश्न माजी नगराध्यक्ष साहेब यांना नागरीक विचारत आहेत.
बीड शहरातील विकासासाठी आज पर्यंत विशेष असे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. यामुळे बीड शहरातील नागरीकांना विविध समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. बीड शहरातील नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही, अनेक भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यासह इतर समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहेत. टॅक्स देण्यात तर येथील नागरीक पुढे असतात मग नागरीकांना सुविधा देण्यात नगर पालिका का कमी पडते याचे उत्तर कोण देणार? जर तुम्ही शिक्षणावर नागरीकांकडून टॅक्स घेत असाल तर त्या पैसातुन येथील नागरीकांना विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन काय दिली नाही. जर शक्य नव्हते तर त्या पैसातुन नगर पालिकेने काय केले? गेल्या 30 वर्षापासून बीड नगर पालिकेवर डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांची एकहाती सत्ता असून सुद्धा आज पर्यंत का एकही शाळा उभारण्यात आली नाही. येथील विद्यार्थ्यांना कधी मिळणार दर्जेदार शिक्षण? आरोग्याच्या नावाखाली सुद्धा टॅक्स घेतला जातो. मग जी दोन रुग्णालय बीड नगर पालिकेने उभारलेली आहेत. त्याठिकाणी सर्व सुविधा नागरीकांना का मिळत नाहीत. अजून आरोग्यसेवेसाठी किती वर्ष नागरीकांनी वाट बघायची आहे. बीड जिल्ह्यात 2.40 टक्केच वनक्षेत्र आहे. मग बीड नगर पालिकेने शहरात वनक्षेत्र वाढवण्यासाठी का पुढाकार घेतला नाही. यासह इतर प्रश्न नागरीक आता विचारत आहेत.
बीडकरांनो येणाऱ्या निवडणूकीत योग्य पर्याय निवडाच.!
बीडकरांना आज पर्यंत मुलभूत प्रश्नांसाठी विविध समस्यांचा सामना करावा लागलेला आहे. परंतु भविष्यात परत हेच होऊ नये असे वाटत असेल तर येणाऱ्या निवडणूकीत चांगला पर्याय देण्याची गरज आहे. सध्याच्या वातावरणावरुन जुन मध्येच निवडणूका होण्याची शक्यता आहे. यामुळे या निवडणूकीत तरी बीडकरांनी योग्य पर्याय दिल्यास भविष्यात तरी येथील मुलभूत प्रश्न मार्गी लागतील अशी आशा आहे.