बीड (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारामुळे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नवा शैक्षणिक मार्ग खुला झाला आहे, शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव असलेले कोटा राजस्थान येथील बंसल क्लासेसचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.
1983 साली व्ही.के. बंसल यांनी बंसल क्लासेस ची स्थापना केली होती. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील आता बंसल क्लासेस उपलब्ध झाले आहे. प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की त्यांचा पाल्य हा दर्जेदार आणि नामांकित क्लासेस मध्ये शिकावा व मोठ्या शहरात जावा. मात्र सर्वांनाच हे शक्य होत नाही यामुळे पालक यांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते. या सर्व बाबींचा विचार करून बीड शहरातील विद्यार्थ्यांसाठी बीड चे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सौ. सारिकाताई क्षीरसागर यांनी कोटा (राजस्थान) येथील बंसल क्लासेस उपलब्ध करून दिले. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते बंसल क्लासेस चे उद्घाटन संपन्न झाले. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा मध्ये जसे स्कॉलरशिप, होमीभाभा, ओलंपियाड, एनटीएसई, एमटीएसई यासारख्या परीक्षांची तयारी फाउंडेशन कार्यक्रमातून पूर्ण होणार आहे. याशिवाय मेडिकल व इंजिनियरींग सारख्या प्रतिष्ठित कोर्सला सामोरे जाण्यासाठी नीट,जेईई परीक्षा द्याव्या लागतात. याची संपूर्ण तयारी बंसल क्लासेस सेंटरला करून घेण्यात येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा देखील घेण्यात येणार आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची या बंसल क्लासेस साठी निवड करण्यात येणार आहे. बंसल क्लासेस मध्ये पाचवी ते बारावी असे वर्ग असणार आहे या सर्व वर्गांसाठी एकूण 500 विद्यार्थ्यांची मर्यादा असणार आहे.
याप्रसंगी पालकांनी आपल्या पाल्यासमवेत या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून बंसल क्लासेस बद्दल माहिती घेतली. डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सौ. सारिकाताई क्षीरसागर यांनी उद्घाटन प्रसंगी आलेल्या पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.याप्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत क्षीरसागर कुटुंबीयांना व बंसल क्लासेसला शुभेच्छा दिल्या.आता बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला आहे