प्रशासना बाहेरच्या कोणाला हवेत मंजुरीपूर्वी पैसे ? – अँड. अजित देशमुख
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यात दारुड्यांचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कुटुंब यातून उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत नवीन दारू दुकानांना मंजुरी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अडीचशे फाईल मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. त्यांना पुन्हा तोंड फुटत आहे. प्राप्त चर्चेनुसार प्रशासना बाहेरील कोणीतरी नवीन दारू दुकान साठी पैसे मागत असल्याची तक्रारही जनतेमध्ये चर्चेत येत आहे. ही बाब गंभीर असल्याचे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात अगोदरच बियर बार, बियर शॉपी, देशी दारू यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. जेवढी अधिकृत दारू विक्री केली जाते, त्यापेक्षा किती तरी पट जास्त अवैध रीतीने दारू विकली जाते. यामध्ये धाबे आणि हातभट्टी वाल्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
बीड जिल्ह्यात दारू मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. घरात, एक व्यक्ती दारू पिणारी असेल, तर पूर्ण कुटुंब एक पिढी मागे जाते. मात्र तरीही प्रशासन आणि शासनातले काही लोक दुकाने वाढण्याचा अट्टाहास का करतात ? हे समजत नाही. सन २०१५ च्या आधी पासून आम्ही जिल्ह्यातील दर दुकाने वाढू नयेत, यासाठी प्रयत्न करीत आहोत.
ज्यांच्या फाईल प्रलंबित आहेत, अशा लोकांमध्ये दारु दुकानासाठी प्रशासनाला पैसे तर द्यावे लागतातच. मात्र प्रशासनाच्या बाहेरचा एक व्यक्ती प्रत्येक दारू दुकानाच्या मंजुरी पूर्वी पैसे मागत असल्याची गंभीर तक्रार जनतेमध्ये चर्चिली जात आहे. ही व्यक्ती कोण याचा तपास देखील आम्ही घेत आहोत.
दारू दुकाने नवीन मंजूर होऊ नयेत, यासाठी आमची सातत्याने भूमिका असते. आमच्या या भूमिके बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. हा मुद्दा त्यांना समजेल. त्याच बरोबर प्रशासनाच्या बाहेर जर असे प्रकार घडत असतील तर त्याकडे देखील जिल्हाधिकार्यांनी लक्ष ठेवावे. ज्या वेळेस आम्हाला अधिकृत माहिती मिळेल, त्यावेळी आम्ही ती माहिती देखील जिल्हा प्रशासनाला कळवू. ऐकीव माहितीवर आमचाही विश्वास नाही. पण चर्चेत तथ्य आहे का ? यासाठी प्रसिद्धी गरजेची वाटते. मात्र असा गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने कटिबद्ध असायला हवं.
नवीन दारू दुकाने मंजूर करू नयेत, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा आणि उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक श्री. घुले यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणखी अडीचशे दारू दुकाने मंजूर झाली, तर जिल्ह्यात गाव तिथे दारू दुकानाची शाखा निर्माण होईल. समाजासाठी ही बाब योग्य नाही. त्यामुळे अशा समाज विघातक कृती रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. जनतेनेही आपापल्या भागात दारू दुकान येऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील अँड. अजित. देशमुख यांनी केली आहे.