पोलीसांची माहिती देण्यास टाळाटाळ
30 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा नोंद होवू नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाची धडपड
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड जिल्ह्यामध्ये अवैध गुटखाविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून हे रोखण्यासाठी पोलीस विभाग काही प्रमाणात कारवाया करत आहे. याच अनूषंगाने मंगळवारी रात्री बीड शहरातील दोन ठिकाणी छापे मारून जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु यातील मुख्य आरोपी सत्ताधारी पक्षातील पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद होण्यास विलंब होवू लागला आहे. सर्वसामान्यांवर गुन्हे नोंद होतात परंतु सत्ताधारी पक्षातील जिल्हाप्रमुखांना अवैध धंदे करण्यास सुट दिली आहे का? असा सुद्धा प्रश्न याठिकाणी उपस्थित होवू लागला आहे. अवैध धंदेप्रकरणी एकाला एक न्याय व एकाला एक असे नकोच. गुटखा प्रकरणामध्ये संबंधीत पोलीस ठाणे, वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे याप्रकरणात अजून सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यामध्ये वाळू तस्करी, अवैध गुटखाविक्री, अवैध दारूविक्री, पत्त्याचे क्लब, यासह इतर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. याप्रकरणी अनेकवेळा माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीसुद्धा अनेकवेळा आवाज उठवला आहे तरी सुद्धा जिल्हाप्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस विभाग या सर्व बाबीकडे का डोळेझाक करत आहे. मंगळवारी बीड परिसरात दोन ठिकाणी पोलीसांनी छापे मारून जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही बाब चांगली सुद्धा आहे. परंतु यातील मुख्य आरोपीवर अजूनसुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला की नाही याची अधिकृत माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. या टाळाटाळीमुळे नेमके या प्रकरणात काय झाले हे मात्र समजू शकले नाही.